अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश

आम्ही कास्तकार, नाशिक: नाशिक जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून थैमान घालणारा अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या शेतमालाचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांना येत्या दोन दिवसांत प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. 

नुकसानीचे पंचनामे करताना नुकसान झालेल्या शेतमालाची पुराव्यादाखल छायाचित्रे काढून पंचनाम्यावर संबंधित शेतकऱ्यांची स्वाक्षरी घेण्याचेही निर्देश शासनाने दिले आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांचा रोष ओढविण्याची भीती सरकारला आहे. त्यामुळे चार दिवस उशिराने का होईना? नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश शासनातर्फे देण्यात आले आहेत. 

नाशिकमध्ये द्राक्ष, कांदा, गहू, भाजीपाला, डाळिंब या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले असून, शेकडो एकरवरील पिके गारपिटीने जमीनदोस्त झाली आहेत. याशिवाय खळ्यावर काढून ठेवलेला उन्हाळ कांदा भिजला, तर द्राक्षबागा कोलमडून पडल्या आहेत. अगोदरच खरीप हंगाम पावसाअभावी गेल्याने हवालदिल झालेला शेतकऱ्याने रब्बीवर आपली भिस्त ठेवली होती. तीदेखील अस्मानी संकटाने उद्ध्वस्त झाली आहे.

Leave a Comment

X