ऊसमधील तण नियंत्रण व उपाययोजना – भाग 2

कसे करावे तणनियंत्रण :
बहुविध प्रकारांनी तणनियंत्रण करणे हे चांगले. वेळोवेळी खुरपण्या, कोळपण्या, बैल अथवा पॉवर टिलरने आंतरमशागत, या बाबी तीन ते चार महिन्यांपर्यंत शक्य होतात. पण पुढच्या वाढीच्या अवस्थेत अशी काही कामे करता येत नाहीत. पिकांचा फेरबदल करणे किंवा तणांबरोबर स्पर्धा करून चांगले उत्पादन देणारी बेवडाची पिके किंवा आंतरपिके घेणे, हे आवश्यक असते. या दृष्टीने खरीप हंगामात मूग, उडीद, चवळी, घेवडा ही छोट्या कालावधीची पिके आणि रब्बी हंगामात हरभरा, गहू, मोहरी अशी पिके उपयुक्त ठरतात.
ऊस पिकाचे व्यवस्थापन चोख असेल तर उगवण लवकर होते, वाढ जोमदार होते आणि पालवीने सर्‍या झाकून गेल्या तर तण वाढायला वाव राहात नाही. सरीच्या मोकळ्या जागेवर पाचटाचे आच्छादन केल्यास विशेषतः खोडव्यामध्ये, तणांचा बंदोबस्त तर होतोच, पण ओलावा टिकून राहतो. मातीचे तापमान उबदार राहाते, सेंद्रिय कर्ब उपलब्ध होतो. पाचटाच्या आच्छादनाने काही किडी वाढतात असा काहींचा समज आहे. पण वस्तुतः पाचटाने खोडकीड कमी होते. सफेद मुंग्या क्वचित दिसतात, पण त्यांचा बंदोबस्त एकरी ८ किलो कार्बारिल पावडरचा वापर करून करता येतो.
रासायनिक तणनाशके : हॅमनर आणि टर्की या शास्त्रज्ञांनी इ.स.१९४४ मध्ये २, ४ डी या रसायनाचा तणनाशक म्हणून यशस्वी उपयोग केला. पण ऊसामध्ये हे तणनाशक उपयुक्त असल्याची नोंद इ.स. १९४८ मध्ये झाली. तेव्हापासून आजतागायत सुमारे २० तणनाशके ऊसामध्ये उपयुक्त असल्याचे प्रयोगातून दिसून आले.
क्रमशः
डॉ. बी. एम. जमदग्नी (सर), M.Sc. (Agri), Ph.D.
वनस्पती शरीरक्रिया शास्त्रज्ञ निवृत्त शास्त्रज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

Leave a Comment

X