ऊसामधील तण नियंत्रण व उपाययोजना – भाग 1

जेव्हापासून शेतीला आरंभ झाला तेव्हापासून शेतकर्‍याला तणांच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. ऊसामध्ये प्रकाश, पाणी, खते, रोपातील व सरीतील अंतर या सर्व बाबी तणांच्या वाढीसाठी इतक्या अनुकूल असतात की त्यामुळे कीड रोग किंवा जनावरे या सर्वांमुळे एकत्रित होणार्‍या नुकसानीपेक्षा पिकाचे होणारे नुकसान जास्त असते. ऊसाचे बेणे पूर्णपणे उगवायला साधारण महिनाभराचा कालावधी लागतो. त्यानंतर अडीच तीन महिन्यांपर्यंत सावकाश वाढ होते. सरीतील अंतर ३.५ ते ५ फूट असते. पाणी नियमित असते. खते दिलेली असतात. याचा एकत्रित परिणाम असा होतो की अनेक प्रकारचे तण पिकामध्ये झपाट्याने वाढू लागते. पीक अडीच महिन्याचे असताना असे तण काढले तर त्याचे एकरी सुके वजन एक टन भरते. त्यातून मोठ्या प्रमाणात ऊसाला घातलेली पोषणद्रव्ये उचलली जातात. फुटवा कमी होतो. कांड्या बारीक व आखूड पडतात. परिणामी ऊसाचे टनेज घटते.
ऊस पिकविणार्‍या प्रत्येक भागात तणांचे वेगवेगळे प्रकार असतात. असे जवळपास १५० प्रकार आहेत. हरळी आणि लव्हाळा हे प्रकार शाखीय पद्धतीने वाढतात. हरळीची एक कांडी जरी जमिनीवर पडली तरी त्याचा चांगला गड्डा तयार होतो. लव्हाळ्याच्या गाठी जमिनीत असतात. त्यांना नागरमोथे म्हणतात. थोडी अनुकूलता मिळाली की झपाट्याने वाढतात.

खुरप्याने भांगलण केली तरी खोलवर नागरमोथे जिवंत रहातात. आठवड्याभरात पुन्हा शेत लव्हाळ्याने भरून जाते. त्याच प्रमाणे कॉनव्होलव्हलस, आयपोमिया (बेशरम प्रकारातील वेल) या बहुवर्षीय वेली ऊसाला वेढून टाकतात. रानमोडी, घोळू (पॉर्चुलाका), शिपाट (ब्राशियारिया) अशा अनेक प्रकारच्या तणांमुळे ७०% पर्यंत नुकसान होते. अशा सर्व प्रकारच्या तणांच्या आधारे अनेक प्रकारच्या किडी व रोगजंतूंना आश्रय मिळतो. सर्वसाधारणपणे लागणीनंतर ३० ते ९० दिवसांपर्यंतच्या काळात तणांच्या प्रादुर्भावाने सर्वात जास्त नुकसान होते. याच काळात फुटवे येत असतात. मुख्य मुळांची वाढ सुरु झालेली असते. जेठाकोंभाला कांड्या दिसू लागतात. या काळात ऊसाची वाढ मागे पडली तर ऊस जोर धरत नाही. बाळभरणी ते भरणी हा काळसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. कारण या काळात जे फुटवे वाढत राहतात, त्यांचेच पुढे गाळपयोग्य ऊसात रुपांतर होत असते. तणांच्या प्रादुर्भावाने त्यांना हानी पोचते. या पुढच्या वाढीच्या काळातसुद्धा आयपोमिया किंवा कॉनव्होलव्हलस यांच्या वेलींनी ऊस गुरफटला जातो. कांड्यातील अन्नद्रव्ये शोषून घेतली जातात. ऊस बारीक होतो. अशा सर्वच अवस्थेमध्ये तणापासून ऊसाचे रक्षण करणे आवश्यक असते.
डॉ. बी. एम. जमदग्नी (सर), M.Sc. (Agri), Ph.D.
वनस्पती शरीरक्रिया शास्त्रज्ञ निवृत्त शास्त्रज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

Leave a Comment

X