एप्रिल महिन्यापासून सीसीआय देशातंर्गत बाजारात कापूस विक्री करणार

कृषिकिंग, पुणे: कापसाच्या किमतीत आलेली तेजी पाहता, भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) एप्रिल महिन्यापासून देशातंर्गत बाजारात कापूस विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. महामंडळाने ऑक्टोबर २०१८ पासून सुरु झालेल्या कापूस हंगामात १०.६० लाख गाठी (१ गाठ-१७० किलो) कापसाची खरेदी केली आहे. 
गुजरातच्या अहमदाबाद बाजार समितीत शंकर-६ प्रजातीच्या दरात वाढ होऊन, तो ४४ हजार ते ४४ हजार ५०० रुपये प्रति कैंडी (१ कैंडी- ३५६ किलो) झाला आहे. सीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, चालू हंगामात महामंडळाने १०.६० लाख गाठी कापसाची खरेदी केली आहे. याशिवाय महामंडळाने ४०० गाठी कापसाची कॉर्मिशयल खरेदी केली आहे. या अधिकाऱ्याने सांगितले आहे की, आठवड्याभरात कापसाच्या दरात जवळपास २ हजार प्रति कैंडीची तेजी आली आहे. 
उत्तर भारतीय कापूस महामंडळाचे अध्यक्ष राकेश राठी यांनी सांगितले आहे की, चालू हंगामात कपाशीचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशातंर्गत बाजारात कपाशीच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे. चालू हंगामात बांग्लादेशमधून चांगली आयात मागणी राहिली आहे. तर या महिन्यात पाकिस्तानसोबतचे निर्यात सौदे कमी झाले आहेत.

Leave a Comment

X