Take a fresh look at your lifestyle.

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे १२२ रूग्ण; ४१ कोव्हिड केअर सेंटरची स्थापना, ७२५३ बेडचे नियोजन

0


कोल्हापूर। कोल्हापूर जिल्ह्यात आज नव्याने ३९ रूग्णाची भर पडल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १२२ वर गेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कालपर्यंत रूग्णांची संख्या ८३ वर होती. त्यात ही भर पडली आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच असताना प्रशासनाचा गोंधळ मात्र सुरूच आहे. तर गेल्या काही दिवसात घेण्यात आलेल्या स्वॅब पैकी १५०० जणांचे रिपोर्ट अजून येणे बाकी असल्याचे समजत आहे. त्यामुळे येत्या काळात जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

आज सायंकाळी ५ वाजून १५ मिनिटानी मिळालेल्या आकडेवारी नुसार ३९ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत. तर काल कोरोनाचे १०१ रूग्ण असल्याच्या चर्चेलाही पूर्णविराम मिळालाय. कालची आकडेवारी ८३ असल्याचे स्पष्ट झालंय. आता सापडलेल्या रूग्णांमध्ये आजरा तालुक्यातील बेलेवाडी येथील ३ तर भादवन येथील एका रूग्णाचा समावेश आहे. सध्या कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी दिलासादायक बाब म्हणजे अद्याप कोल्हापूरचा समावेश ऑरेंज झोनमध्येच असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अद्याप तरी कडक आणि सक्तीच्या नियमांचा रेड झोन कोल्हापूरच्या वाट्याला आलेला नाही. 

जिल्ह्यात मुंबई, पुणे, सोलापूर तसेच इतर जिल्ह्यातून आलेल्या लोकांच्यामुळे कोरोनाबाधितांच्या संख्येत भर पडत आहे. त्यामुळे आरोग्य विभागामार्फत ४१ कोव्हिड केअर सेंटरची स्थापना करण्यात आली असून यामध्ये रूग्णसेवेसाठी पहिल्या टप्प्यात ३ हजार १४२ बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. उर्वरित दोन टप्प्यात ४ हजार १११ बेड तयार करण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली आहे. जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या ४१ कोव्हिड केअर सेंटरच्या माध्यमातून सुमारे ७ हजार २५३ बेड तीन टप्प्यामध्ये आवश्यकतेनुसार तयार करण्याचे नियोजन आहे. आतापर्यंत पहिल्या टप्प्यातील ३ हजार १४२ बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. ४ कोव्हिड केअर सेंटरमधून ओपीडी सुरू झाल्याचेही ते म्हणाले.

डेडीकेटेड कोव्हिड हॉस्पिटलच्या माध्यमातून तीन टप्प्यात २ हजार ६८४ बेड निर्माण तयार करण्याचे नियोजन असून आतापर्यंत १ हजार ८० बेड तयार करण्यात आले आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यात ४० टक्के, दुसऱ्या टप्प्यात ३० टक्के आणि तिसऱ्या टप्प्यात ३० टक्के बेड तयार करण्याचे नियोजन आहे. तसेच डेडीकेटेड कोव्हिड केअर सेंटरमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये ४० टक्के, दुसऱ्या टप्प्यामध्ये ३० टक्के, तिसऱ्या टप्प्यामध्ये ३० टक्के असे एकूण २ हजार ६८४ बेड तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यातील १ हजार ८० बेड तयार झाले आहेत.

Previous articleप्रशासनाच्या अपयशाची सुरुवात…

Source link

X