खरिपातील कडधान्य पीक व्यवस्थापन – २

खरीप हंगामात विविध कडधान्याची लागवड केली जाते. यासाठी व्यवस्थापन कसे करावे याचा आढावा घेताना खरिपातील कडधान्य पीक व्यवस्थापन या लेखाच्या पहिल्या भागात आपण जमीन- हवामान, पूर्वमशागत, खत व्यवस्थापन, आंतरपीक अशा विविध पैलूंचा आढावा घेतला. या भागात आपण पाणी व्यवस्थापन, कीड नियंत्रण आणि रोग नियंत्रण यासारख्या विविध पैलूंबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.

पाणी व्यवस्थापन –

खरीप कडधान्य पिके बहुतांशी पावसाच्या पाण्यावर येते. परंतु पावसाळ्यात पाऊस कमी झाला असल्यास आणि जमीन मध्यम उथळ असल्यास ओलावा फार काळ टिकून राहत नाही. जमिनीतील ओलावा खूपच कमी झाला आणि फुले लागल्यावर उशिरा पाणी दिल्यास पिकाची मोठ्या प्रमाणावर फुलगळ होते. हे टाळण्यासाठी जमिनीतील ओलावा फार कमी होण्यापूर्वीच आणि फुले येण्याच्या सुरवातीलाच संरक्षित पाणी द्यावे.
अवर्षणप्रवण भागात लवकर येणाऱ्या तुरीच्या पिकास पावसाची शक्यता नसेल आणि पाणी देण्याची सोय उपलब्ध असेल तर पहिले पाणी फुलकळी लागताना, दुसरे पाणी पीक फुलोऱ्यात असताना आणि तिसरे शेंगात दाणे भरताना द्यावे. मात्र पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

एकात्मिक कीडनियंत्रण –

तूर पिकाचे खरे आर्थिक नुकसान शेंगांतील कोवळ्या दाण्यावर उपजीविका करणाऱ्या घाटे अळी, पिसारी पतंगाची अळी शेंगेवरील काळी माशी या प्रमुख किडींपासून होते. या किडीचे वेळीच नियंत्रण केले नाही तर उत्पन्नात 30 ते 40 टक्के घट येते. त्यासाठी तूर पिकाची पेरणी वेळेवर करावी, पिकाची फेरपालट करावी, उन्हाळी नांगरट व पूर्वमशागत, पूर्वीच्या पिकाची धसकटे वेचून घ्यावीत, सुधारित वाणांची पेरणी करावी, पेरणीपूर्वी बियाण्यांस बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी, तसेच राझोबियम चोळावे. बाजरी/ ज्वारी/ भुईमूग/ सोयाबीन या पिकांबरोबर तूर हे आंतरिक घ्यावे, वेळेवर कोळपणी व खुरपणी करावी. फेरोमोन ट्रॅप (गंध सापळे) पिकांमध्ये लावावेत. पक्ष्यांना बसण्यासाठी काठ्या/ मचाने लावावेत. गरजेनुसार खालील कीटकनाशकाची फवारणी करावी.
तूर पिकावर किडींचा प्रादुर्भाव मोठ्या स्वरूपात आढळून आल्यास आवश्यकतेनुसार इमामेक्टिन बेन्झोएट चार ग्रॅम अथवा स्पिनोसॅड चार मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. म्हणजेच या कीटकनाशकांचे प्रमाण 200 मि.लि. प्रति हेक्टर प्रमाणे येते. या कीटकनाशकांच्या फवारणीमुळे प्रभावी कीडनियंत्रण होते.
मूग आणि उडीद या पिकांवर प्रामुख्याने भुरी आणि यलो मोझॅक (पिवळा विषाणू) या रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो.
भुरी रोगाच्या प्रादुर्भावामुळे पिकाच्या खालील पानांवर पांढरे ठिपके दिसतात व थोड्याच दिवसांत पानांच्या बऱ्याचशा भागावर अनियमित आकाराचे पिवळे चट्टे दिसू लागतात. भुरीच्या नियंत्रणासाठी प्रादुर्भाव दिसून येताच पाण्यात मिसळणारे गंधक 1250 ग्रॅम किंवा 500 ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति 500 लिटर पाण्यातून फवारावे.
यलो मोझॅक या विषाणूजन्य रोगाचा वाहक असलेल्या पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी 30 टक्के प्रवाही डायमेथोएट 500 मि.लि. 500 लिटर पाण्यातून प्रति हेक्टरी फवारावे. आवश्यकता भासल्यास आठ-10 दिवसांनी आणखी एक फवारणी करावी.

तुरीवरील वांझ रोगाचे नियंत्रण –

ऊस पिकाच्या शेजारी तूर पेरणी केल्यास (म्हणजेच तूर पिकाच्या एका बाजूस अथवा दोन्ही बाजूंस लागून ऊस पीक असेल तर) हमखास तुरीवर वांझ रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. ऊस पिकास बारमाही पाणी दिले जात असल्याने रोगासाठी अनुकूल वातावरण तयार होते. वांझ रोगास कारणीभूत असणारा माईट (वाहक कोळी) मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. तूर पिकाची लागवड ऊसाशेजारी टाळावी.
वांझ रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोळी किडीच्या (माईट) नियंत्रणासाठी प्रादुर्भाव दिसताच डायमेथोएट (30 टक्के प्रवाही) 10 मि.लि. किंवा डायकोफॉल (20 टक्के प्रवाही) 25 मि.लि. किंवा फिप्रोनील (25 टक्के प्रवाही) सहा मि.लि. किंवा प्रोफेनोफॉस (50 टक्के प्रवाही) चार मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रोगाची तीव्रता जास्त असल्यास 10 ते 12 दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी करावी.

Leave a Comment

X