गगनबावडा कोव्हिड केअर सेंटर ‘सुसज्ज’ असल्याचा केवळ दिखावाच…!


गगनबावडा। जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत असल्याने आरोग्ययंत्रणा मजबूत करण्याच्या उद्देशाने तालुका पातळीवर कोव्हिड केअर सेंटर तयार करण्यात आली आहेत. जिल्ह्यात आजघडीला प्रशासनामार्फत विविध ठिकाणी ४१ कोव्हिड केअर सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. परंतु गगनबावडा येथील कोव्हिड केअर सेंटर म्हणजे असून अडचण नसून खोळंबा असेच असल्याचे चित्र सध्याच्या घडीला पहायला मिळत आहे. 

गगनबावडा तालुक्यात सध्या कोरोनाबाधितांची संख्या ६ आहे. यापैकी २ रूग्ण कोल्हापूर येथील सीपीआर मध्ये उपचार घेत आहेत. तर उर्वरित तीन कोरोनाबाधित रूग्ण गगनबावडा येथील सेंटर मध्ये दाखल आहेत. गगनबावडा येथे सुरू असलेल्या या सेंटरमध्ये मात्र या रूग्णांची आणि क्वारंटाईन करण्यात आलेल्या लोकांची सुविधांअभावी हेळसांड होत आहे. सेंटरमध्ये कोणत्याही प्रकारची स्वच्छता नाही (याचा व्हिडीओच क्वारंटाईन केलेल्यांपैकी एकाने व्हायरल केल्याने खळबळ उडालीय). पेशंट आणि इतर क्वारंटाईन केलेल्या लोकांना वेळेवर जेवण आणि पाणी उपलब्ध होत नाही. रूग्णांचे पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर दोन दिवसानंतर त्यांना औषधांचा एक डोस देण्यात येतोय. वेळेवर जेवण आणि पाणी उपलब्ध नसल्याने औषधोपचार तरी कसा करायचा असा प्रश्न येथे कार्यरत असणाऱ्या वैद्यकीय स्टाफसमोर आहे. उपाशीपोटी औषधोपचार केला आणि औषधाची रिअॅक्शन आली तर त्याला जबाबदार कोण या भितीपोटी औषधोपचार करणेही टाळले जात आहे.

या सेंटरमधील कोरोनाबाधित पेशंट आवश्यक गोष्टींसाठी सेंटरमध्ये फिरत असून क्वारंटाईन केलेल्या लोकांच्या संपर्कात येत असल्याचे चित्र आहे. देखरेखीसाठी ठेवलेला पोलिस स्टाफ देखील संसर्ग होऊ नये या भितीपोटी बिल्डींग प्रवेशच करत नसून सेंटरमध्ये जें चाललयं ते बाहेरून बघण्यापलीकडे काहीच करत नाहीत. या सेंटरमध्ये ९० लोक क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यापैकी काहींना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती तहसिलदारांनी दिलीय.

याठिकाणची गंभीर बाब म्हणजे कोरोनाबाधित रूग्णांवरील उपचाराची संपूर्ण जबाबदारी कंत्राटी कर्मचाऱ्यांवर ढकलण्यात आली असून परंमनंट डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ याठिकाणी काम करणे टाळत आहेत. परमंनंट स्टाफ कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून केवळ बाहेरूनच सूचना देण्याचे काम करत असल्याचे याठिकाणी चित्र आहे. कोरोनोबाधित रूग्ण भरती केले असले तरी त्यांच्यासाठी गरज पडल्यास एकाही व्हेंटिलेटरची सोय नाही. याठिकाणी केवळ बेड टाकून आरोग्य यंत्रणा सुसज्ज केली असल्याचा प्रशासनाने दिखावा करून केवळ फोटोशेसन पलीकडे याठिकाणी कोणत्याही सोईसुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत.

गगनबावडा कोव्हिड केअर सेंटरच्या आरोग्यसेवेसंदर्भात तालुका आरोग्यअधिकारी विशाल चोकाककर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सुरवातीला याबाबत माहिती देण्यास टाळाटाळ करत उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच ही सर्व माहिती तहसिलदार यांच्याकडून घेण्यास सांगितले. सध्या कोव्हिड सेंटरवर ४ डॉक्टर आणि ८ नर्सिंग स्टाफ कार्यरत आहे. यापैकी कंत्रीटीना २४-२४ तास ड्युटी लावली जात असून, नियमाप्रमाणे कोरोनाबाधित कक्षात ड्युटी केल्यावर यांना क्वारंटाईन देखील केले जात नाही.

जोपर्यंत या सेंटरमध्ये कोरोनाबाधित रूग्ण दाखल झाले नव्हते तोपर्यंत प्रशासकीय यंत्रणेतील वरिष्ठ अधिकारी भेट देत होते. परंतु जेव्हा पहिला रूग्ण दाखल केला गेला, तेव्हापासून वरिष्ठांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरवशावर हे सेंटर सोडून दिले आहे.

Previous article… आणि क्वारंटाईनमधील तरूणाचे घरी परतण्याचे स्वप्नं अधुरेच राहिले!

Source link

Leave a Comment

X