पुन्हा सत्तेत आल्यास शेतकरी सम्मान योजनेची पाच एकरची मर्यादा रद्द करणार- मोदी


कृषिकिंग, पिंपळगाव बसवंत(नाशिक):“भाजप सरकार पुन्हा सत्तेत आल्यास महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना किसान सम्मान योजनेचा फायदा दिला जाईल, त्यासाठी सध्या अस्तित्वात असलेली किमान पाच एकर जमीनीची अट रद्द केली जाईल,” अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. ते आज (सोमवार) नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे आयोजित प्रचारसभेत बोलत होते.

दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार भारती पवार, नाशिकचे शिवसेना उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हेही यावेळी उपस्थित होते.

गोदावरीचे पाणी गुजरातला वळविण्याच्या मुद्द्यासंदर्भात विरोधक अफवा पसरवताहेत. त्यामुळे गोदावरीचे पाणी गुजरातला पळवण्याच्या मुद्द्यात काहीही तथ्य नसून, इथले पाणी कुठेही जाणार नसल्याचे सार्वजनिकदृष्ट्या जाहीर करत आहे. असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

‘सरकार कांद्यावरील निर्यात मूल्य कमी करणार आहे. कृषी अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी पारंपरिक प्रथा मजबूत करण्याची गरज आहे. महागाई वाढताच काँग्रेस आपल्या पध्दतीने गोंधळ घालत गृहिणी व शेतकऱ्यांची दिशाभूल करतात अन गैरवापर करून घेतात. मोदींचा लढा हा शेतकरी आणि व्यापाऱ्यामधील माध्यस्थांविरुद्ध आहे,’ असेही मोदी यांनी यावेळी सांगितले आहे.

Leave a Comment

X