मतदानासाठी मजुरांची गावी परतण्याची सोय करता मग आपत्ती काळात विरोध का? : सदाभाऊंचा आक्रमक पवित्रा


पुणे। मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये अडकलेल्या राज्यातील मजुरांसाठी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी आक्रमक पावित्रा घेतला केला आहे. या मजुरांना गावात प्रवेश देण्यास विरोध करणाऱ्या लोकप्रतिनिधींचाही त्यांनी समाचार घेतलाय. मुंबई आणि पुण्यासारख्या महानगरातील मजुरांना गावी परतण्याची सोय सरकारनं त्वरित करावी, अशी मागणीही सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

निवडणुकीत मतदानासाठी या कामगारांना गावात आणण्यात सर्वच राजकीय पक्ष पुढे असतात. हे कामगार तुमचा जयजयकार करण्यासाठी गावात आलेले चालतात. मग अशा आपत्तीच्या काळात या मजुरांना त्यांच्याच गावात विरोध का करता, असा सवाल सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला आहे. आम्ही या कामगारांना, मजुरांना वाऱ्यावर सोडणार नाही. यासाठी सरकारने त्वरित उपाययोजना करावी. अन्यथा आंदोलन करु, असा इशाराच सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.

“लॉकडाऊनमुळे मुंबई, पुण्यासारख्या महानगरात अनेक ठिकाणी राज्यातील मजूर कामगार अडकले आहेत. त्यांच्या जवळील पैसा आणि अन्नधान्य संपलं आहे. अशाही परिस्थितीत ते हजारो मैल पायपीट करत आहे. सरकार देशातील नागरिकांना परदेशातून विमानानं मायदेशात आणत आहे. तर राज्यातील परप्रांतीयांना रेल्वे आणि बसने पाठवले जात आहे. असे असताना आपल्याच राज्यातील विविध जिल्ह्यातील मजुरांना, कामगारांना सवतीची भूमिका का?” असा सवालही सदाभाऊ खोत यांनी विचारला आहे.

या मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी सरकारने उपाययोजना करावी. अन्यथा परप्रांतीय मजुरांप्रमाणे राज्यातील मजूरांचा प्रश्न ही गंभीर बनेल. अशी भीती खोत यांनी व्यक्त केली आहे. तसेच हे मजूर गावात आल्यानंतर त्यांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये क्वारटांईन करुन ठेवा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

Previous articleखासदार धैर्यशिल मानेंच्या पुढाकाराने क्वारंटाईनचा नवा ‘कोल्हापुरी पॅटर्न’

Source link

Leave a Comment

X