Take a fresh look at your lifestyle.

‘महाबीज’तर्फे बीजोत्पादनासाठी आगाऊ आरक्षण

0
जळगाव : आगामी खरिपासाठी सोयाबीन, उडीद, मूग, ताग, बाजरा, कापूस आदी पिकांचे पायाभूत व प्रमाणित बियाणे उत्पादित करण्यासाठी ‘महाबीज’तर्फे अग्रिम आरक्षण योजना सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना हे आरक्षण लक्षात घेऊन या बीजोत्पादनात कार्यक्रमात सहभागी होता येईल.


ग्रामबीज संकल्पना वाढीसाठी काही सवलती महाबिजने दिल्या. यात एकाच गावातील शेतकऱ्यांनी निर्देशित सर्व पिकांची मिळून २०१ हेक्‍टरवर लागवडीचे क्षेत्र आरक्षित करून तशी ठोस नोंदणी महाबीजच्या कार्यालयात केली, तर संबंधित गावातील शेतकऱ्यांना प्रमाणीकरणाचे तपासणी शुल्क माफ होईल.
१५१ ते २०० हेक्‍टर क्षेत्र आरक्षित केल्यास ७५ टक्के तपासणी शुल्क माफ होईल. १०१ ते १५१ हेक्‍टर क्षेत्र बीजोत्पानासाठी आरक्षित केल्यास ५० टक्के तपासणी शुल्क माफ होईल. तूर व तागासाठी किमान २० हेक्‍टर क्षेत्र सलग आरक्षित करणे आवश्‍यक आहे. यासाठी १०० टक्के तपासणी शुल्क माफ केले जाईल. 
सोयाबीनचा दर निश्‍चित केला अाहे. १ डिसेंबर २०१९ ते ३० जानेवारी २०२० यादरम्यान बाजार समितीमध्ये जे दर असतील, तो दर आणि अधिक २५ टक्के जादा दर मिळेल. पाचोरा, जळगाव व अमळनेर बाजार समितीमधील दर त्यासंबंधी गृहीत धरले जातील. या कार्यक्रमाचा आरक्षण कालावधी १० एप्रिलपासून सुरू होईल. तो १० मेपर्यंत असेल. यादरम्यान संबंधित शेतकऱ्यांना कापूस, उडीद, मूग, सोयाबीन, तागाचे बियाणे उपलब्ध होईल. बियाणे वितरण शेतकऱ्यांना केले जाईल.
या योजनेत सहभागासाठी शेतकऱ्यांना बॅंक पासबुक, आधार कार्ड, सातबारा उतारा यांची सत्यप्रत द्यावी लागेल. महाबीजच्या एरंडोल (जि. जळगाव) येथील बीजप्रक्रिया केंद्रापासून ५० किलोमीटर परिघात असलेल्या शेतकऱ्यांना त्यात प्राधान्य दिले जाईल. अधिक माहितीसाठी महाबीजच्या रिंगरोड (जळगाव) भागातील कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन महाबीजचे व्यवस्थापक एस. एस. सावरकर यांनी केले.
X