Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्रवासियांच्या उरात धडकी भरवणारे ‘निसर्ग’ चक्रीवादळ काही वेळातच अलिबागला धडकणार, मुंबई आणि कोकणाला सर्वाधिक फटका बसणार

0


https://www.windy.com/?13.785,78.508,6

मुंबई महाराष्ट्रावासियांच्या उरात धडकी भरवणारे ‘निसर्ग’ चक्रीवादळ कोकणाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचले आहे. सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास ‘निसर्ग’ चक्रीवादळ अलिबागपासून अवघ्या १३० किमी, तर मुंबईपासून १७५ किमी दूर अंतरावर होते. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास निसर्ग चक्रीवादळ अलिबागला धडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

रत्नागिरीत वाऱ्याने चांगलाच वेग पकडला असून वाऱ्याचा वेग ताशी १०० ते ११० किमीवर जाण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाचा प्रभाव आज (बुधवार ३ जून) आणि उद्या महाराष्ट्रावर पडण्याची शक्यता आहे. यासोबतच मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर ३ जूनला चक्रीवादळ धडकण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार चक्रीवादळाची मार्गक्रमणा सुरू असून मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका हरिहरेश्वर आणि अलिबागला बसण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

भाईंदरच्या उत्तन सागरी किनारपट्टीवर NDRF,पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान सज्ज करण्यात आलेत. किनारपट्टीवरील जवळपास ५००० हजार नागरिकांना शाळा आणि चर्चमध्ये सुरक्षितस्थळी हलवलं आहे. मिरा भाईंदर मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी ही माहिती दिलीय. उत्तन किनारपट्टीवर जवळपास ७ ते ८ हजार नागरिकांचं वास्तव्य असून उत्तन किनारपट्टीवर २.३० ते ३.०० वाजेपर्यंत निसर्ग चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे. 

या चक्रीवादळात रत्नागिरीतील मिऱ्या समुद्रावर अजस्त्र लाटांमध्ये एक जहाज भरकटले आहे. जहाजाला मिरकरवाडा बंदरात नेण्याचे प्रयत्न असफल ठरले. जहाजावर काही खलाशी अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासूनच कोणालाही समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला होता. रत्नागिरीत सध्या एनडीआरएफच्या दोन टीम दाखल आहेत. मात्र मिऱ्या समुद्रावर अजस्त्र लाटा उसळलेल्या असताना जहाज भरकटल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे.

दरम्यान, हे चक्रीवादळ धडकण्यापूर्वी राज्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावलीय. मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारासह कोकणात रात्रीपासून पावसाने जोर धरला आहे. अनेक ठिकाणी वाऱ्याचा जोर वाढला आहे. तर काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला आहे. मुंबईतदेखील काल रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली. मुंबईसह उपनगरात रात्रभर पावसाचा जोर आहे. मुंबईत गेल्या १२ तासात २० ते ४० मिलीमीटर इतका पाऊस झाला. मुंबईतील कुलाबा, दादर, जुहू आणि मरिन ड्राईव्ह या परिसरात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर अरबी समु्द्राजवळील किनारपट्टीच्या भागांमध्ये अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे.

https://www.windy.com/?13.785,78.508,6Source link

X