राज्य सरकारची विधानसभेची तयारी, शेतकऱ्यांना लवकरच सरसकट कर्जमाफी देणार

राज्य सरकारची विधानसभेची तयारी,
शेतकऱ्यांना लवकरच सरसकट कर्जमाफी

मुंबई : लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होण्याआधीच राज्य सरकार आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं दिसत आहे. राज्य सरकार लवकरच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याच्या विचारात आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीआधी राज्य सरकार हे मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. थकबाकीदार शेतकरी व थकबाकीची माहिती जिल्ह्याजिल्ह्यातून मागविण्यात आली आहे. आतापर्यंत दिलेल्या कर्जमाफीत मार्च, २०१६ पर्यंत काढलेले कृषिकर्ज व थकबाकीदार शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आहे. आता २०१६-१७ आणि २०१८ पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यानाही कर्जमाफीचा लाभ दिला जाणार असल्याचे कळाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. अन्य कारणांनी कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्यांनाही कर्जमाफी दिली जाणार आहे.

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली पाहिजे, असा आग्रह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धरला होता. आपली ही अट मान्य केल्यानेच आपण युतीसाठी तयार झालो, असे ठाकरे यांनी म्हटले होते. राज्य सरकारने आतापर्यंत राज्यातील ४३ लाख ३५ हजार शेतकऱ्यांना १८ हजार २३५ कोटी रुपयांची कर्जमाफी दिली आहे.

Leave a Comment

X