Take a fresh look at your lifestyle.

सगळं स्थिरस्थावर होईल, पण पुढच्या काळात आपल्याला आपल्याच गावकुसानं अव्हेरलं ही जाणीव कायम भळभळतं राहील…!

0


जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चच्या मध्यापर्यंत अनेकांना करोना हा रोग पार तिकडे कुठल्यातरी लांबच्या देशाची निर्मिती आहे आणि त्याच्या संहारासाठी तो बनला आहे असाच बोलबाला होता. करोना संपूर्ण जग व्यापत असताना आपल्याकडे आनंदीआनंद होता हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही. एकूणच आरोग्याबाबत आपल्याकडे असलेले अडाणीपण, आयुर्वेदाबाबदच्या भंपक समजुती (उदा: प्रत्येक आजरासाठी गोमुत्र प्या असा संदेश देणे), कडक उन्हात करोनाचा विषाणू मरून जाईल अशा आवया उठवणे, आणि मोदींपासून ते त्यांचे भक्त आणि राज्यातील नव्याने तयार झालेले भक्त यांच्यातील गोंधळामुळे करोना आज एखाद्या सिनेमाला साजेसा पसरतोय.

सध्या मुद्दा आहे तो पुणे, मुंबई आणि देशांतील इतर शहरांत अडकलेले लोक आपापल्या गावांत जाताहेत आणि येणारे लोक करोना घेऊन येतात असा समज करून बहिष्कृत करण्याचा. एकप्रकारची सामाजिक दरी यामुळं निर्माण झाली आहे. एक गोष्ट खरी आहे की आत्ता रेड झोन मधून येणारे काही लोक बाधित आहेत आणि ते गावात आले तर गावे बाधित होण्याची शक्यता जास्त आहे. दुसरी गोष्ट अशी की मुंबई असो अथवा कुठलेही शहर असो तापमानाच्या बाबतीत चढउतार राहिलेला नाही. त्यामुळे सगळेच घरात बसून होरपळत आहेत. शहरातील घरे ही उचल्या वस्तूंवर चालतात. म्हणजे गावाकडच्यासारखं परड्यात गेला आणि कोथंबिर खुडून आणली. शेजाऱ्याकडून कांदा आणला, दूध नाही, गोठ्यात जाऊन धार काढली, असला काही प्रकार नसल्याने झक मारत घराबाहेर पडावे लागते. स्वप्नांच्या मागे धावत असताना अनेकांना हा मोठा झटका आहे, स्वप्नांच्या मागे धावता धावता सुखी कुटुंबात रमण्याचे स्वप्नही पार धुळीला मिळेल की काय अशी धास्ती घेऊनच अनेकजण आज शहरात जगतातहेत.

साध्या कामासाठीही बाहेर पडल्यानंतर करोना कुठे गाठेल याचा नेम नाही. आधीच अस्थिर असलेल्या आयुष्यात करोनाने मरणाची धास्ती पेरून ठेवली आहे. अशा काळात काहीतरी करून घराबाहेर पडावे आणि गाव गाठावे असा आकांत मनात मांडला असताना एकीकडे प्रशासन आणि दुसरीकडे ग्रामस्थ त्यांना पार भरडून टाकताहेत. अनेकांना आपल्या जीवाची धास्ती आहे हे खरेही आहे. पण मोदीभक्तीने पछाडलेले अनेकजण सीमेवरच्या जवानांचे उदाहरण द्यायचे, फेसबुक, व्हॉटस अॅपवर ते बलिदान देत होते. आत्ता मरतो की नंतर मरतो असे त्यांना वाटत होते. स्वत:च स्वत:ला प्रमाणपत्र देत होते. अशा काही भक्तांच्या पोस्ट वाचल्या तर संताप येतो. मुळात मेंदू नसलेले आणि मानवीयतेचा अंश नसलेले हे भक्त आता पुणे, मुंबई आणि अन्य शहरांतील नागरिक म्हणजे दहशतवादी वाटतात. ते आपल्याला मारण्यासाठीच येत आहेत असा समज करून अनेक लोकात गैरसमज पसरवत आहेत. कोणत्याही पोस्टची खातरजमा न करता मंदबुद्धीने फॉरवर्ड करण्याची सवय लागलेले शहरात आणि गावागावांत नुसत्या अफवा पसरवत आहे. काठीला तेल लावलेले पोलिस आता गरज असताना काहीच करत नाहीत.

गेले दोन महिने लोक आहेत तेथे बसून होते, आता हाताला काम नाही, घरात खायला नाही, जीवावर उठलेला रोग कधी गाठेल आणि कुटुंब उद्धस्त करेल याचा नेम नाही. त्यामुळे अनेकांनी कच्चीबच्ची अगदी खांद्यावर घेऊन, म्हातारी माणसं सायकलवर घालून हजारो किलोमीटरचा प्रवास सुरू केला आहे. लहान मुलांचे व्हिडिओ पाहिले की गलबलून जायला होतं, जीवाच्या आकांतानं गाव जवळ करणाऱ्या या माणसांत फोर व्हिलरमधून जाणाऱ्यांचीही हीच अवस्था आहे. त्यांना आज श्रीमंती, सुख, सुविधा यापेक्षा जीवाची धास्ती आहे, आणि ते अगदी बरोबर आहे. अशा काळात हे आमच्या गावात आले का? असा संवेदनाशून्य प्रश्न विचारणे माणुसकीच्या कुठल्याच प्रकारात बसत नाही. जीवन-मरणाच्या खेळात दैव मी मानत नाही पण आजवर पत्रकार म्हणून अनेक अपघातांच्या बातम्या जेव्हा पाहतो त्यावेळी त्यातले विचित्र योगायोग, त्या माणसाची शेवटच्या काही दिवसांतील देहबोली, वर्तणूक आपल्याला विचार करायला लावते. अशा वेळी मरणाची चाहूल लागली असे अनेकजण म्हणतात. खरे खोटे करण्यात अनेक चर्चा झडू शकतात. सांगण्याचा मतितार्थ इतकाच की मरण कुणाला कधी गाठेल याचा नेम नाही. त्यामुळे तुम्ही मरायला कशाला इकडे आलात असे म्हणणे म्हणजे अमरपट्टा घेऊन जन्माला आल्यासारखे वाटणे सहाजिक आहे. पण असे म्हणणारे मुर्खांच्या बाजारात फिरतात याची मात्र खात्री होतेय.

एकीकडे प्रशासन प्रचंड घोळ घालत असताना पहिल्या टप्प्यात पुढारपण करायची आयती संधी मिळालेल्या ग्रामकमिट्या आता दबावामुळे का असेनात आवाक्यात आल्या आहेत. गावाबाहेरून आला की त्याला टाका शाळेत, हा खाक्या आता बंद झाला आहे. मुळात या रोगाची भयानकता काय आहे? किती लोक गावात येऊ शकतात, आपल्याकडे एका खोलीत किती लोक राहू शकतात? त्यांच्या सोयीचे काय? त्यांच्या जेवणाचे काय? याचा विचार मुळात प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनीच केला नसल्याने ग्रामकमिट्यांच्या डोक्यापलिकडचा विषय होता. त्यामुळे सगळाच आनंदीआनंद होता. आता मुंबई आणि पुण्याच्या लोकांना ठेवण्यास जिल्हा पातळीवर जागा नाही. मग त्यांनी जबाबदारी ढकलली तालुक्यांवर, तालुक्यांच्या ठिकाणीही जागा नाही म्हटल्यावर आणि जबाबदारी घ्यायची नाही म्हटल्यावर त्यांनी सोपवले गावांवर. आता गावात शाळा एक. त्यातही पाचवी किंवा सातवी. सात वर्ग खोल्या असतील तर त्यातल्या एक ऑफिस आणि दुसरी अडगळीची. उरल्या पाच खोल्या. यात दहाच लोक राहू शकतात. मग करायचे काय? असा प्रश्न गावसमित्यांसमोर आहे.

लोक शेकड्याने येताहेत आणि सुविधा दहा ते पंधरा लोकांची. आता आधी क्वारंटाइन केलेल्यांच्या नंतर आलेल्या लोकांना होम क्वारंटाइन करावे तर आधीचा गळपट्टीच धरतो आहे. त्यामुळे पुढारपण अंगाशी येत आहे. आता पुरती त्रेधा उडाली आहे. तरीही त्यातून सावरून समित्या झट्या देत आहेत. ज्यांना काहीच देणंघेणं नाही असे मेसेजबहाद्दूर काड्या घालून गमजा बघताहेत. असे संवेदनाशून्यच लोक विचारू शकतात की, ‘हे लोक इकडे कशाला येतात?’ जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तरी आपलं गाव, घर हेच आपलं अंतिम ठिकाण असतं. हा रोग जाईल. सगळं स्थिरस्थावर होईल पण पुढच्या काळात आपल्याला आपल्या गावकुसानं अव्हेरलं ही जाणीव कायम भळभळत राहील. या जखमा आपलं सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याला कारणीभूत ठरतील. या काळात गुळणी धरून बसलेल्यांनी किमान काही शहाणपणाच्या गोष्टी सांगण्याची गरज आहे.

लेखन : बाळासाहेब हरी पाटील (पत्रकार, महाराष्ट्र टाईम्स)

लोकांनी जायचं कुठं?जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चच्या मध्यापर्यंत अनेकांना करोना हा रोग पार तिकडे कुठल्यातरी लांबच्या…

Posted by Balasaheb Hari Patil on Sunday, 17 May 2020

Source link

X