[ad_1]
पुणे | शहरात कोरोनासंदर्भात मोठी धक्कादायक घटना समोर आली असून दोन महिन्याच्या बाळाचा कोरोनाने मृत्यु झाल्याची घटना तब्बल सात दिवसांनी उघड झालीय. गंभीर बाब म्हणजे महापालिकेच्या दप्तरी देखील या चिमुकल्याच्या मृत्युची नोंद सात दिवसांनी दाखवली असून माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे.
ही घटना नेमकी कशी घडलीय याचा पुणे महापालिकेच्या आरोग्ययंत्रणेला ठावठिकाणादेखील नाही. संबधित बाब आरोग्ययंत्रणेच्या निदर्शनास आणून दिली तरी साधी चौकशी करण्यापलीकडे महापालिकेची यंत्रणा हललेली नाही. संबंधित हॉस्पिटलला नोटिस पाठवू असे सांगून महापालिकेच्या आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
याबाबत घडलेली घटना अशी, सोमवार पेठेतील केईएम हॉस्पिटलमध्ये ३ जूनला दोन महिन्यांच्या बाळाला (मुलगा) उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याच्या घशातील द्रव पदार्थांच्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली आणि तो कोरोना “पॉझिटिव्ह’ असल्याचे चार जूनला निदान झाले. तेव्हाच, त्याच्यावर याच हॉस्पिटलमध्ये पुढचे तीन दिवस उपचार करण्यात आले. मात्र, सात जूनला बाळाचा मृत्यू झाला. ही घटना घडून शनिवारी सात दिवस झाले; तोपर्यंत बाळाचा जीव गेल्याची पुसटशी कल्पनाही महापालिकेच्या आरोग्य खात्याला नव्हती. किंबहुना ती आमच्यापर्यंत पोचविण्यात आली नसल्याचे महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेकडून आता सांगितले जात आहे.
शहरातील नवे रुग्ण, कोरोनामुक्त, मृत्यू याचा एकत्रित अहवाल महापालिकेच्या आरोग्य खात्याकडून रोजच्या रोज जाहीर केला जातो. त्यात महापालिकेच्या रुग्णालयांसह खासगी हॉस्पिटलमधील रुग्णांचा तपशील असतो. मात्र, गेल्या सात दिवसांत या बाळाच्या मृत्युची नोंद कुठेच दाखविली गेली नाही. परंतु, शनिवारच्या रिपोर्टमध्ये बाळाचा मृत्यू झाल्याचे नोंदविल्याचे दिसून आले. तेव्हा; त्यावरच्या तारखांवर नजर टाकली असता, हा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
बाळाचा मृत्यू सात जूनला झाला, तर त्याची नोंद आज का दाखविली? हा प्रश्न आरोग्य अधिकाऱ्यांना विचारला असता महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे म्हणाले, “नेमकं काय झालं आहे? हे जाणून घेत आहोत. त्यासाठी चौकशी केली जाईल आणि त्याआधी हॉस्पिटलला नोटिस देऊन त्यांच्याकडून खुलासाही मागविण्यात येईल.”
आरोग्यअधिकाऱ्यांनी असे डिप्लोमॅटिक उत्तर देऊन प्रकरण थंड करण्याचा प्रयत्न केला असला तरी, मुळात, कोरोना रुग्णांच्या तपासणीपासून, त्यांच्यावरचे उपचार, कोरोनामुक्तांचे आकडे यासह आपल्या कामाचा तपशिल मांडणाऱ्या महापालिकेने खासगी हॉस्पिटलमधील रुग्णांच्या उपचारांकडे मात्र काणाडोळा केल्याची बाब या घटनेवरून उघडकीस आली आहे. त्यामुळे एकूणच पुणे महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
[ad_2]
Source link