[ad_1]
कोल्हापूर | मुंबईहून कोल्हापूरातील भुयेवाडी येथे घरी आलेल्या तरूणाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. रविवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालात या तरूणाला कोरोनाची लागण झाल्याचे समजल्याने गावात खळबळ उडाली आहे.
पॉझिटिव्ह आलेला तरूण मुंबई येथे नेव्हीत कार्यरत होता. तो शुक्रवारी (३ जुलै) सायंकाळी भुयेवाडी येथील घरी आला. ही माहिती ग्रामपंचायत प्रशासनाला कळाल्यानंतर त्यांनी तातडीने या तरूणास सीपीआर येथे पाठवून त्याचा स्वॅब दिला होता. याचा अहवाल रविवारी (५ जुलै) रोजी प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह आला आहे. या तरूणाला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाल्याने त्याच्या घरातील चौघांनाही रात्री उशिरा सीपीआर येथे स्वॅबसाठी दाखल करून स्वॅब घेतले आहेत.
दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून भुयेवाडी ग्रामपंचायतीने संपूर्ण गाव लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असून बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांबरोबरच स्थानिकांनाही कोरोनाची लागण होऊ लागल्याने प्रशासनाची चिंता वाढू लागली आहे.
[ad_2]
Source link