[ad_1]
#पडळकर_साहेबांना_पत्र
भावी गृहमंत्री पडळकर साहेब,
स. न. वि. वि.
पत्र, लिहिण्यास कारण की,
शप्पथ तुमच्यात आम्हाला राज्याचा भावी गृहमंत्री दिसतोय. अहो ज्या माणसावर टिका करताना लोकांची हातभर फाटती, त्यांना तुम्ही थेट कोरोनाची उपमा दिली? आता, लाखो लोक तुम्हाला शिव्या देतील. पण तुम्ही माघार घेणार नाही, तुम्ही माफीही मागणार नाही याची आम्हाला खात्री आहे. कारण तुम्ही जे बोलता ती काळ्या दगडावरची पांढरी रेघ असते. भाजपच्या दारात जायला मला काय कुत्र चावलयं का? असं तुम्ही म्हणाला होता आणि आज तुम्ही भाजपचे आमदार आहात. पण, ते जाउद्या.
तुम्ही आधी रासपमध्ये होते. त्या पक्षाला कोलून तुम्ही भाजपमध्ये गेले. भाजपलाही फाट्यावर मारत तुम्ही वंचित बहुजन आघाडीत गेले. तिथं पराभव झाल्यावर तुम्ही पुन्हा भाजपमध्ये गेले, याला म्हणतात राजकीय परिपक्वता. उगीचच लोक तुम्हाला बहुजन हृदयसम्राट, भाजपची मुलुखमैदानी तोफ किंवा दबंग आमदार नाही म्हणत साहेब? अहो १ लाख ६५ हजार मतांनी हारणे, डिपॉजिट जप्त होणे आणि तरीही विरोधकांच्या नाकावर टिच्चून आमदार होणे सोपे नसते. थुंकलेलं चाटायला हिम्मत लागते, पण ते विरोधकांना काय कळणार?
अहो लोकसभा निवडणूकीच्या धामधुमीत तुमचा धुमस नावाचा पिक्चर काय येतो? त्यात तुम्ही हिरो म्हणून काम काय करता? अहो गृहमंत्रीसाहेब, एकच काळीज आहे आमच्याकडं. किती वेळा लुटणार? खरं सांगू साहेब, आज दिवसभरात तुम्ही लोकप्रियतेच्या बाबतीत मोदी साहेबांना आणि शाहीद आफ्रिदीलाही मागं टाकलंय बघा.
सलग चार निवडणूका हारुनबी माणूस कसा हसतमुख असावा, हे तुमच्याकडं पाहून कळतं. आता तुम्ही भाजपमध्ये आहात म्हणजे भाजप पुन्हा सत्तेत येणार. फक्त एकच मागणी आहे साहेब, भाजपवाले मनुस्मृतीचे पालन करतात, अशी अफवा आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी या पक्षाचे नाव बदलून तुम्ही भारतीय बहुजन पार्टी असे ठेवावे, ही विनंती.
पुढच्या वर्षी तुम्ही गृहमंत्री व्हाल, त्यानंतर आपल्याला केंद्रात पोहचायचं. मराठी पिक्चरमधून थेट बॉलीवूडमध्ये एंट्री करायचीये. सैराटचा जसा धडक झाला तसा धुमसचा आपल्याला धुसफुस करायचाय. शेवटी पंतप्रधानाचं शीट एका हाडाच्या कलाकारासाठीच असतय साहेब. त्यामुळं तुम्हाला आम्हा बहुजनांचा इशारा कळाला असेलच. तुम्ही कितीबी नकार द्या, पण हे वाचताना तुम्ही गालातल्या गालात हसत असणार, हे आम्हाला माहितीये.
असो, आता निरोप घेतो. भले फडणवीस साहेब त्यांना पित्यासमान म्हणाले असतील पण तुम्ही तुमच्या वक्तव्यावर नेहमीसारखे ठाम रहाल ही बिरोबा चरणी प्रार्थना.
कळावे,
कट्टर पडळकर समर्थक नितीन थोरात
[ad_2]
Source link