शेती

बोंड अळी रोखण्यासाठी फरदड कपाशीचा मोह टाळा

भारतात कापूस पिकाखाली सुमारे १२.५ दशलक्ष हेक्टर क्षेत्र असून, महाराष्ट्रामध्ये ४२.०७ लाख हेक्टर क्षेत्र आहे. जागतिक पातळीवर कापूस पिकाखालील क्षेत्र सर्वाधिक असूनही हेक्टरी उत्पादकता ही अन्य कापूस उत्पादक देशांच्या तुलनेत कमी आहे. याला अनेक कारणे आहेत. त्यातील महत्त्वाचे कारण म्हणजे कीडरोगांचा प्रादुर्भाव.


  • सध्या गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव हा आर्थिक नुकसान पातळीपेक्षा अधिक राहिला आहे. राज्यामध्ये बीटी कपाशी व दीर्घ कालावधीच्या जातींची लागवड शेतकरी करत आहेत. बीटी जातींसाठी गुलाबी बोंड अळीने प्रतिकारता विकसित केल्याचे दिसून येते.
  • यावर्षी अनेक विभागामध्ये गुलाबी बोंड अळीचे प्रमाण आर्थिक नुकसान पातळीच्या वर गेले आहे. काही शेतकरी संपूर्ण वेचण्या झाल्यावर शेतात उभ्या असलेल्या कपाशीच्या झाडांना पुन्हा खत व पाणी देऊन फरदड पीक घेण्याला पसंती देतात.
  • परिणामी गुलाबी बोंड अळीला मुबलक अन्नपुरवठा उपलब्ध होत राहतो. तिचे जीवनचक्र फरदड पिकामध्ये पूर्ण होते. तिच्या अनेक पिढ्या तयार होऊन पुढील हंगामात पुन्हा गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. हे लक्षात घेता शेतकऱ्यांनी फरदड घेण्याचा मोह टाळावा.
  • शेतकऱ्यांनी कापूस पीक माहे डिसेंबर अखेर शेतातून काढून टाकावे. फरदड घेऊ नये.
  • गुलाबी बोंड अळीला डिसेंबर महिन्यानंतर खाद्य उपलब्ध न झाल्यास ती सुप्त अवस्थेत जाते. मात्र, फरदड पिकामुळे मुबलक खाद्य उपलब्ध होत राहते. तिचा जीवनक्रम सुरळीत चालू राहतो. पुढील हंगामातील कापूस पिकावर सुरुवातीलाच तिचा पुन्हा प्रादुर्भाव होतो.
  • कपाशीची शेवटची वेचणी संपल्यावर लगेच शेतात जनावरे उदा. शेळ्या, मेंढ्या , गायी, म्हशी, इत्यादी सोडाव्यात. ती कपाशीच्या झाडावरील कीडग्रस्त बोंडे, पाने खाऊन टाकत असल्याने किडीच्या अवस्था नष्ट होतील.
  • कपाशी पिकाच्या सर्व अवशेष नष्ट करून शेत स्वच्छ ठेवावे किंवा अन्य उन्हाळी पिकाची लागवड करून पिकाची फेरपालट करावी. अशा फेरपालटीमुळे गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावाला आळा बसतो.
  • अथवा उन्हाळ्यात जमिनीची खोलवर नांगरणी करावी. यामुळे किडीचे कोष वर येऊन उन्हाने किंवा पक्ष्याद्वारे खाल्ले गेल्याने नष्ट होतील.
  • उपटलेल्या पऱ्हाट्याचे ढीग शेतात तसेच न ठेवता ते गावाजवळ आणून ठेवावे. त्यांचा वापर पेरणीपूर्वी करावा किंवा त्यांची यंत्राद्वारे बारीक कुट्टी तयार करून कंपोस्ट करावे. अथवा इंधनासाठी ठोकळे (विटा, पॅलेट्स) बनवाव्यात. म्हणजे त्यामधील किडींच्या सुप्त अवस्थांचा नाश होईल.
संपर्क ः डॉ. प्रशांत नेमाडे, ०९८५०२०८१११
( कीटकशास्त्रज्ञ, कापूस संशोधन विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.)
Show More
Ads

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close