शेती

कोल्हापूर जिल्ह्यात खते-बियाणे यांचा पुरेसा साठा उपलब्ध; तरीही शेतकऱ्यांना मात्र काहीच मिळेना!


कोल्हापूर। जिल्ह्यात खते, बि-बियाणे यांची पुरेशी उपलब्धता असताना देखील कोरोनाच्या नावाखाली शेतकऱ्यांना ती मिळण्यात मोठ्या अडचणी येऊ लागल्या आहेत. गावपातळीवरील कोरोनाकमिट्या प्रशासनाच्या परवानगीशिवाय परस्पर गाव दोन-दोन, तीन-तीन दिवस बंद ठेवत असल्याकारणाने शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया जातो की काय अशी भिती यामुळे निर्माण झाली आहे. सध्या ऊसाच्या भरणीसाठी खतांची मोठ्याप्रमाणात गरज असताना ती उपलब्ध होत नसल्याने शेतकरी पुरता हतबल झाला आहे. काही खतविक्रेते याचा गैरफायदा घेत असून अव्वाच्या सव्वा दराने खत विक्री करत आहेत. तर काहीजण आवश्यक असणाऱ्या खतांबरोबर नको असलेले प्रोडक्टदेखील शेतकऱ्यांच्या माथी मारून उखळ पांढरं करून घेत आहेत. प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देऊन शेतकरी वर्गाची होणारी गैरसोय टाळावी अशी मागणी जिल्ह्यातील शेतकरी वर्गाकडून होऊ लागली आहे. 

गगनबावडा तालुक्यातील शेतकरी वर्गाकडून माहिती घेतली असता प्रमुख बाजारपेठा असणाऱ्या असऴज, साळवण, गगनबावडा या प्रत्येक गावातील शेतीसेवा केंद्रे गेल्या काही दिवसांपासून बंद आहेत. तालुक्यात २२ कृषिसेवा केंद्र परवानाधारक असून देखील तालुक्यात शेतकऱ्यांना खते-बियाणे मिळत नाहीत. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून तर ज्या – ज्या कृषीसेवाकेंद्र धारकांनी दुकाने सुरू ठेवली त्या प्रत्येकांनी खतांचे लिंकीग केल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच युरिया, डीएपी, 10:26:26 यासारख्या खतांचे अव्वाच्या सव्वा दर आकारल्याचे देखील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. साधे किटकनाशक हवे असल्यास देखील त्याच्यासोबत विविध प्रकारची टॉनिक आणि औषधे शेतकऱ्यांच्या माथी मारली जातात. याची लेखी तक्रार होत नसल्याने अशा कृषीसेवाकेंद्रधारकांचे उखळ पांढरे होत असल्याचे चित्र आहे.

  • यासंदर्भात जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी जिल्ह्यात खते आणि बि-बियाण्यांची पुरेशी उपलब्धता असल्याचे सांगितले. सध्या जिल्ह्यात ४ हजार १३ मेट्रीक टन युरिया उपलब्ध झाला असून ३२०० मे. टन युरिया येत्या चार-पाच दिवसात उपलब्ध होणार आहे. तसेच इतर खतांचा साठा देखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावांमध्ये लॉकडाऊन केले जात असल्याने काही ठिकाणी समस्या निर्माण झाल्या आहेत. परंतु याची प्रशासनाने दखल घेतली असून पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हापोलिसप्रमुख यांच्या आदेशानुसार खते-बियाणे विक्री सुरळीत करण्याच्या सुचना संबंधिताना दिल्या आहेत. तरीदेखील कुणाला खते-बियाणे मिळण्यास अडचणी येत असतील त्यांनी कृषिविभागाकडे तक्रार करावी असे सांगितले आहे.

सध्या खरीप हंगाम तोंडावर असून शेतकरी खरीपासाठी लागणाऱ्या खतांची, बिबियाण्यांची तजवीज करण्यात गुंतला आहे. तसेच ऊसाच्या मोठ्या भरणीची कामे हातघाईवर आली असल्याने खतांची अधिक गरज आहे. परंतु या परिस्थितीत कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गावपातळीवरील यंत्रणा लॉकडाऊन करत असल्याने अत्यावश्यक सेवादेखील लोकांना मिळणे मुश्किल झाले आहे. 

Previous articleगगनबावडाः ‘त्या’ २ महिन्याच्या बाळालाही कोरोनाची लागण!

Source link

Show More
Ads

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close