शेती

शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय, ‘अशी’ होणार ‘थकबाकीदार’ शेतकऱ्यांची ‘कर्जमुक्ती’..!

मुंबई। महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील प्रलंबित थकबाकीदार खातेदारांसाठी शासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला असून खरीप हंगामात अशा शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यातील अडचणही दूर झाली आहे. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा अद्यापही लाभ न मिळू शकलेल्या पात्र शेतकरी बांधवांना तो मिळवून देण्यासाठी कर्जाची रक्कम शासन व्याजासह भरणार आहे.

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने शेतकरी वर्गाची प्रलंबित कर्जमुक्ती योजना थांबवली होती. परंतु यामुळे प्रलंबित थकबाकीदार शेतकऱ्यांना नवीन खरीप हंगाम २०२० साठी पीककर्ज मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. बॅंकानी थकबाकीदार शेतकऱ्यांच्याकडून वसूलीची मोहिम सुरू केल्याने जाग्या झालेल्या महाराष्ट्र सरकारने आदेश देत, सदर थकबाकीदार शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरील थकबाकी ‘शासनाकडून येणे दर्शवावी’ असे सांगितले आहे. तसेच शेतकऱ्यांची कर्जखाती निरंक करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. यामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमुक्तीचे पैसे थेट जमा होणार नसले तरी त्यांच्या नावावरील कर्जाचा बोजा ‘शासनाकडून येणे दर्शविला’ जाणार आहे.

असा आहे शासन निर्णय –
  1. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ या योजनेअंतर्गत शासनाकडून योजनेच्या पोर्टलवर प्रसिध्द केलेल्या यादीमधील ज्या लाभार्थ्यांना त्यांच्या कर्जखात्यावर लाभ आलेला नाही अशा लाभार्थ्यांना थकबाकीदार न मानता खरीप २०२० साठी पीक कर्ज द्यावे.
  2. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकानी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नमूद केलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर योजनेअंतर्गत निर्गमित केलेल्या यादीमधील थकबाकीची रक्कम शासनाकडून येणे दर्शवावी. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकानी या अनुषंगाने संबंधित विविध कार्यकारी सहकारी संस्था यांना कळवावे. संबंधित विविध कार्यकारी सहकारी संस्था यांनी अशा शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर असलेली रक्कम शासनाकडून येणे दर्शवावी व त्यांनी अशा शेतकऱ्यास खरीप २०२० साठी पीक कर्ज द्यावे.
  3. शासनाकडून रक्कमेवर वर नमूद केल्याप्रमाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकानी दिनांक १ -४-२०२० पासून सदर रक्कम त्यांना प्राप्त होण्याच्या दिनांकापर्यंत जिल्हा बॅंकानी त्यावर व्याज आकारणी करावी. शासनाकडून संबंधित जिल्हा बॅंकाना असा निधी व्याजासहित देण्यात येईल. मात्र सदर योजनेत पोर्टलवर प्रसिध्द केलेल्या यादीतील ज्या शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर कर्जमुक्तीची रक्कम जमा झाली नाही अशा शेतकऱ्यांना संबंधित जिल्हा बॅंकानी खरीप २०२० साठी पीक कर्ज उपलब्ध करून दिल्यास, अशाच खातेदारांच्या कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शासनाकडून देय असलेल्या रक्कमेवर शासन संबंधित जिल्हा बॅंकाना व्याज देईल.
व्यापारी बॅंका व ग्रामीण बॅंकातील खाती –
  1. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ या योजनेअंतर्गत शासनाकडून योजनेच्या पोर्टलवर प्रसिध्द केलेल्या यादीतील लाभार्थ्यांच्या कर्जमाफीची रक्कम व्यापारी बॅंका व ग्रामीण बॅंका यांनी शासनाकडून येणे दर्शवावी. तसेच, व्यापारी व ग्रामीण बॅंकामध्ये शेतकऱ्याच्या NPA कर्ज खात्यावर शासनाकडून अशा कर्जखात्यावर देय असलेली रक्कम शासनाकडून येणे दर्शवावी. व याशिवाय अशा NPA कर्ज खात्यावर बॅंकानी  सोसावयाची रक्कमेचा अशा कर्जखात्यात अंतर्भाल करावा.
  2. व्यापारी व ग्रामीण बॅंकानी तात्काळ लाभार्थी शेतकऱ्यांना खरीप २०२० साठी नवीन पीककर्ज उपलब्ध करून द्यावे.
  3. व्यापारी बॅंका व ग्रामीण बॅंकानी लाभार्थ्यांच्या कर्जखात्यावर शासनाकडून येणे रक्कमेवर नमूद केल्याप्रमाणे देय असलेल्या रक्कमेवर दिनांक १-४-२०२० पासून त्यांना सदर रक्कम प्राप्त होण्याच्या दिनांकापर्यंत बॅंकानी त्यावर व्याज आकारणी करावी. शासनाकडून संबंधित व्यापारी बॅंका व ग्रामीण बॅंकाना असा निधी व्याजासहित देण्यात येईल. मात्र सदर योजनेत पोर्टलवर प्रसिध्द केलेल्या यादीतील ज्या शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर कर्जमुक्तीची रक्कम जमा झाली नाही अशा शेतकऱ्यांना संबंधित व्यापारी बॅंका व ग्रामीण बॅंकानी खरीप २०२० साठी पीक कर्ज उपलब्ध करून दिल्यास, अशाच खातेदारांच्या कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शासनाकडून देय असलेल्या रक्कमेवर शासन संबंधित व्यापारी बॅंका व ग्रामीण बॅंकाना व्याज देईल.

योजनेच्या अंमलबजावणीची कार्यवाही यापूर्वी विहित केल्यानुसार उपरोक्त बदल विचारात घेऊऩ करण्यात यावी. सदर आदेश महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने रमेश शिंगटे, अवर सचिव तथा सहनिबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र शासन यांनी प्रसिध्द केला आहे.

Source link

Show More
Ads

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close