कोल्हापूर| कोल्हापूर जिल्ह्यात आज सकाळी कोरोनाचे १२ नवे रूग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. यातील करवीर तालुक्यात आढळलेले ५ रूग्ण हे कम्युनिटी स्प्रेडचे असल्याची शंका बळावल्याने जिल्ह्यात सोमवारपासून कडक लॉकडाऊन केला जाण्याचे संकेत जिल्हाधिकारी देसाई यांच्याकडून मिळत आहेत.
जिल्ह्यात कोरोनाची स्थिती आटोक्यात आणण्यात प्रशासन यशस्वी ठरले असले तरी नव्याने आढळलेल्या रूग्णाची कोणतीही प्रवास हिस्ट्री नाही, त्यामुळे हे कम्युनिटी स्प्रेडचे रूग्ण असल्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे कम्युनिटी स्प्रेडची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन केला जाण्याची अधिक शक्यता वर्तवली जात आहे.
करवीर तालुक्यातील बीडशेड, सावर्डे दुमाला, पासर्डे, गर्जन येथील हे रूग्ण आहेत. यामध्ये भाजीपाला विक्रेते, कंपाऊंडर, लॅब तंत्रज्ञ यांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्याची प्रशासकीय यंत्रणा हादरली आहे. गेले काही दिवस जिल्ह्यातील कोरोना रूग्णांच्या वाढीचा वेग झपाट्याने खाली आला होता. मात्र आता कम्युनिटी स्प्रेडच्या शक्यतेने जिल्हात खळबळ उडाली आहे.
आज सकाळी १० वाजेपर्यंत १३२ प्राप्त अहवालापैकी ११७ अहवाल निगेटिव्ह तर १२ अहवाल पॉझीटिव्ह (७०८ पैकी यापूर्वीचे ३ अहवाल पॉझिटिव्ह आहेत असे मिळून एकूण १३२) आले आहेत. आजअखेर जिल्ह्यात एकूण ९९ पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली आहे. १२ पॉझीटिव्ह अहवालामध्ये गडहिंग्लज तालुक्यातील-१, हातकणंगले तालुक्यातील-१, करवीर तालुक्यातील-५, पन्हाळा तालुक्यातील-२ व शाहुवाडी तालुक्यातील-१ व कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील-२ रूग्णांचा समावेश आहे.
कोल्हापूरातील आठ महत्वाची ठिकाणे अतिजोखीमग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये लक्ष्मीपुरी, रूईकर कॉलनी यासारख्या ठिकाणांचा समावेश आहे. तर दुसरीकडे जो डॉक्टर कोरोनाबाधित आढळला होता त्याच्या संपर्कात उपचारासाठी आलेले रूग्ण देखील पॉझिटिव्ह आढळू लागले आहेत, त्यामुळे सामूहिक संसर्गाचा धोका लक्षात घेऊऩ हे संकेत दिले जात आहेत.