मुंबई | सारथी संस्थेच्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत छत्रपती संभाजी राजेंना व्यासपीठाऐवजी बैठक व्यवस्थेच्या तिसऱ्या रांगेत स्थानं देण्यात आल्याने बैठकीत गोंधळ निर्माण झाला. संभाजी राजेंना बैठकीत तिसऱ्या रांगेत स्थान दिल्याने बैठकीतील मराठा समन्वयकाला ही बाब खटकली त्यानंतर गोंधळाला सुरवात झाली.
सारथीबाबत मंत्रालयात आज अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अजित पवार यांच्या विनंतीवरूनच संभाजी राजे उपस्थित झाले होते. यावेळी बैठकीला आलेल्या छत्रपती संभाजी राजे यांना समोरील रांगांमध्ये खालील खुर्च्यांवर बसलेल्या सदस्यांमध्ये तिसऱ्या रांगेत स्थान देण्यात आले. त्यामुळे बैठकीला उपस्थित असलेल्या मराठा समाज समन्वयकांनी तीव्र आक्षेप नोंदवत संभाजी राजे यांना व्यासपीठावर बसावं असा आग्रह धरला. यावरून समन्वयकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. यावेळी अजित पवारांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र ते शांत झाले नाहीत. शेवटी संभाजी राजे यांनीच समजूत काढून तिसऱ्या रांगेतच बसणं पसंत केलं.
याबाबत संभीजीराजेंनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, सदस्य म्हणून या बैठकीला उपस्थित झालेलो आहे. कोणत्याही मान-सन्मानासाठी आलेलो नाही. त्यामुळे मला सरकारला प्रश्न विचारता येतील. व्यासपीठावर बसलो, तर माझी भूमिका वेगळी होईल.