अकोला ः जिल्ह्यात २०१९-२० च्या हंगामात वेगाच्या वाऱ्यामुळे पिकांचे नुकसान झाले होते. त्यासाठी पीकविमा कंपनीने मदत जाहीर केली आहे. ही मदत २६४ रुपयांपासून असल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. याशिवाय शेतकऱ्यांनी पंचनामा करून स्वतः विमा कंपनीकडे कागदपत्रे देऊनही त्यांची नावे या यादीत नसल्याने आश्चर्यही व्यक्त केले जात आहे.
जिल्ह्यातील शेतकरी केळी, संत्रा या पिकांचे उत्पादन घेण्यात अग्रेसर मानले जातात. प्रामुख्याने तेल्हारा, अकोट तालुक्यांत या फळबागांचे क्षेत्र मोठे आहे. हे शेतकरी दरवर्षी विविध नैसर्गिक आपत्ती येत असल्याने पीकविमा उतरवितात. यासाठी तेव्हा हेक्टरी ८८०० रुपयांचा भरणाही केला होता.
सन २०१९-२० च्या हंगामात आंबिया बहरासाठी शेतकऱ्यांनी केळी, तसेच संत्रा फळबागांचा विमा काढला होता. त्या वर्षी मे महिन्यात तापमान, तसेच वेगाच्या वाऱ्यामुळे बागांचे अतोनात नुकसान झाले होते. शेतकऱ्यांनी तेव्हा विमा कंपनीला माहिती देत मदतीची मागणीही केली होती. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. काही शेतकऱ्यांनी स्वतः याबाबत कागदपत्रे विमा कंपनीकडे सादर केली. या नुकसानीसाठी आता भरपाई जाहीर झाली आहे. या भरपाईमध्ये बहुतांश शेतकऱ्यांना हजार रुपयांच्या आतच मदत जाहीर झाली आहे.
काहींना तर अवघे २६४ रुपये देण्यात आले. दुसरीकडे काहींना मात्र योग्य मोबदला दिला गेला. परंतु ही यादी चाळली असता मोजक्या कुटुंबातील सदस्यांना मदत मिळाल्याचे दिसून येते. यामुळे अनेक शेतकरी विमा कंपनीच्या निकष व नुकसानभरपाईबाबत आता आक्षेप व्यक्त करीत आहेत. यासंदर्भात लवकरच सामूहिक स्वरूपाची तक्रार तसेच आंदोलनाची तयारीसुद्धा शेतकऱ्यांनी सुरू केली आहे.
कुणाला २६४, कुणाला ५२८ रुपये
या मदत यादीत अत्यंत तोकडी मदत जाहीर झालेली आहे. काही शेतकऱ्यांना २६४ रुपये तर काहींना ५२८ रुपये मदत असल्याचे दिसून येते. ही भरपाई २९५ शेतकऱ्यांना मिळाली आहे. वास्तविक जिल्ह्यातील पाचशेवर शेतकऱ्यांचे तेव्हा नुकसान झाले होते. यापैकी बहुतांश शेतकऱ्यांनी विमा कंपनीला कळविले. परंतु आता मदत जाहीर झाल्यानंतर अनेकांची नावे या यादीतच नाहीत. कागदपत्रे देऊनही नावे कुठे गायब झाली, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.
प्रतिक्रिया
वेगाच्या वाऱ्यामुळे माझ्या केळी बागेचे नुकसान झाले त्याचा पंचनामा व कागदपत्रे मी स्वतः विमा कंपनी प्रतिनिधीकडे दिली होती. मात्र आता नुकसानभरपाईची यादी बघितली असता त्यात नावच नसल्याचे दिसून आले. माझ्यासारखे असंख्य शेतकरी यादीत नाहीत.
– विकास देशमुख, केळी उत्पादक, पणज, जि. अकोला
पीकविमा कंपन्या सातत्याने शेतकऱ्यांना नाचवीत आहेत. प्रीमियमच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात पैसे भरून घेतात. मात्र नुकसानभरपाई देताना वस्तुस्थितीला धरून दिली जात नाही. पीकविमा कंपन्या, अधिकारी, सरकारचे साटेलोटे असल्याने शेतकरी लुटल्या जात आहे. अकोल्यातील केळी उत्पादकांच्या पीकविमा प्रश्नांवर लवकरच तेथील जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. केळी उत्पादकांना पै-पै मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.
– रविकांत तुपकर, नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना