चहा खाणारे म्यानमारी लोक – Dr. Satilal Patil

चहा खाणारे म्यानमारी लोक :

चहा प्यायचा असतो, हे आपल्याला माहिती आहे. नेहमीचा दूध घालून केलेला चहा, ग्रीन टी यांच्या जोडीला म्यानमारमध्ये चहा चक्क खाल्ला जातो. चहाचे लोणचं म्हणजेच लाफेट हे पानात असलंच पाहिजे. त्याशिवाय जेवण पूर्ण होत नाही.

बुलेटवरील बर्मीज सफर बहरात आलीय. येथील स्थानिक अन्नपदार्थांची चव चाखत, म्यानमारी पाहुणचार खात दिवस मजेत जाताहेत. प्रत्येक जेवणानंतर ग्रीन टी आग्रहाने पाजला जातोय. येथील जेवणात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे रोजच्या जेवणात हिरव्या पानांचा, कडवट चवीचा एक पदार्थ रोज वाढला जातोय. ‘’हा काय प्रकार आहे’’? मी लोकल गाइड ‘’श्री. हाताय’’ ना विचारलं. तेव्हा ‘’सर आम्ही चहा नुसता पीत नाही तर खातो सुद्धा’ असं मिश्किल उत्तर मिळालं. ‘’आपण रोज जो हिरव्या पानांचा पदार्थ खातोय ना तो पदार्थ म्हणजे चहा आहे’’. ‘’श्री. हाताय’’ नी हातोहात माहिती दिली. काय? चहा? मी उडालोच.. दररोज मी चहाची भाजी खातोय? तेव्हा ही भाजी नसून लोणचं आहे असं समजलं.

चहा खाणारे म्यानमारी लोक
चहा खाणारे म्यानमारी लोक

जगभर पिला जाणारा चहा इथं खाल्ला जातो यावर विश्वास बसत नव्हता? पण हे खरंय, की इथं चहा खाल्ला आणि पिला जातो. म्यानमारच्या जेवणात ‘लाफेट ठोक’ म्हणजे चहाच्या पानाच्या लोणच्याचा मुख्यत्वे समावेश होतो. ‘’लाफेट’’ किंवा ‘’लापेट’’ असं त्याला म्हणतात. ‘’लाफेट’’ चा शब्दशः अर्थ ओला चहा असा होतो. बर्मीज भाषेत एक म्हण आहे, “ये थी मा थायेत, ये थार मा वेट, ये वेट मा लाफेट” म्हणजे फळांत आंबा, मटणात डुकराचं मटण आणि पानांमध्ये ‘लाफेट’ म्हणजे चहाच्या पानांच लोणचं सर्वोत्कृष्ट असतं. आंबवलेलं चहाचं हे लोणचं देशभरात अगदी घरोघरी खाल्लं जात.

लाफेट म्यानमारची राष्ट्रीय डिश आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. चहा खाणं हे म्यानमारमध्ये सामाजिक कार्य आहे. जेवणाबरोबर इतर पदार्थांबरोबर प्लेटमध्ये सजवलेलं लाफेट समोर येत. जेवणापूर्वी किंवा जेवणानंतर स्नॅक म्हणून ते वाढतात. पण परंपरेनुसार एका डब्यात डाळ, शेंगदाणे, तीळ यासारख्या पदार्थांच्या मधोमध लाफेट ठेऊन भेट देतात. आपल्याकडे बडीशोफ, सुपारीचा डबा असतो ना, अगदी तसाच हा डबा असतो.

अगदी शाळा कॉलेजपासून ते क्लब आणि हॉटेल्सपर्यंत लाफेटवर हात मारला जातो. काही ठिकाणी याची अगदी हुक्क्यासारखी पार्टी होते. या ओल्या चहाचा ओल्या पार्टीतही उपयोग होतो. तरुणांच्या पार्टीत मदिरेसोबत चखणा म्हणून चहाचं लोणचं असतंच. वाईनमधील कडवट टॅनिन आणि अँटीऑक्सिडंट गुणांचं लाफेटचं टॅनिन यांची जुगलबंदी स्वादग्रंथींना चेतवत डोक्यात चढतात.

लाफेट सेवन ही म्यानमार मधील प्रागैतिहासिक प्राचीन प्रथा आहे. फार पूर्वी आदिवासी लोकं बांबूच्या पोकळ नळीत चहाची पानं कुजवायचे. ११व्या शतकात पगान साम्राज्याच्या राजा अलंगसेतूने ही  प्रथा सुरु केली होती, असा उल्लेख लोक साहित्यात आहे.  पुराणकाळात राजाच्या दरबारातही चहापान केलं जायचं याचे दाखले मिळतात. त्या काळातील कवितांनुसार लाफेट हे शाही अन्न आणि चहा हे शाही पेय म्हणून गौरवलं गेलंय. म्यानमारमध्ये बौद्ध धर्म आल्यावर दारूची जागा या लोणच्याची घ्यायला सुरवात केली. त्यामुळे मागणी वाढायला लागल्यामुळे १५व्या शतकापर्यंत शान प्रांतात चहा लागवडीचे क्षेत्र वाढायला सुरवात झाली. सतराव्या शतकापर्यंत म्यानमार मधून मोठ्या प्रमाणात कापूस निर्यात होत होता. पण त्यानंतर मात्र चहाने या शर्यतीत बाजी मारली.  म्यानमारच्या वेगवेगळ्या राज्यात चहा पिकाचं उत्पादन घेतलं जातं. उत्तर म्यानमार मध्ये ‘’शान’’ आणि ‘’तवांगपेंग’’ राज्यात चहा मळ्यांचे प्रमाण अधिक आहे.  देशातील सर्वांत जास्त उत्पन्न घेऊन ‘’शान’’ राज्याने  देशाची ‘’शान’’ राखलीय. डोक्यावर टोपली घेत कोवळी चहापत्ती तोडत म्यानमारच्या बायका मळ्यांमध्ये काम करत असतात. एप्रिल, मे च्या महिन्यात चहाच्या सुगीचा हंगाम असतो. पण काही लेट लतीफ शेतकरी लाफेटच्या कच्च्या मालाचा हा हंगाम  पार ऑक्टोबर पर्यंत लांबवतात.  देशात एकूण ७० हजार हेक्टर क्षेत्रावर चहाची लागवड केली जाते. यातून पावणेआठ कोटी किलो चहापत्तीचं उत्पादन केलं जातं. ( चहा खाणारे म्यानमारी लोक )

या चहामळ्यांमध्ये पिकवलेल्या चहापत्तीपासून तीन प्रकारची उत्पादने बनवली जातात. पहिला हिरवी चहापत्ती सावलीत वाळवून ‘’ग्रीन टी’’ साठी चहापत्ती बनवतात. ग्रीन-टी हे इथलं राष्ट्रीय पेय आहे. ग्रीन-टी नंतर ताडीचं पेयपान इथं मोठ्या प्रमाणात होतं. हो! ताडी डोक्यात चढवून सातव्या आसमंतातातील माडीवर चढण्याच्या राष्ट्रीय कार्यात बरेच जण मग्न असतात.

दुसऱ्या प्रकारात जरा जास्त तापमानात वाळवून काळी चहा पावडर बनवली जाते. ‘’अचो गायाक’’ असं तिला म्हणतात. तिचा उपयोग आपल्यासारखा दूध आणि साखर टाकून फक्कड चहा बनवण्यासाठी होतो. तिसऱ्या आणि शेवटच्या प्रकारात ताजी हिरवी पाने लाफेट हे लोणचं बनवण्यासाठी वापरलं जातात. म्यानमारमध्ये पिकवल्या जाणाऱ्या एकूण चहापत्तीपैकी ५२% ग्रीन टी बनवायला, ३१% काळ्या चहा पावडरसाठी आणि १७ टक्के पानं लोणच्यासाठी वापरली जातात.

भांडण सोडवण्यात या लोणच्याचा उपयोग होतो. हो! पूर्वीपासून शांततेचं प्रतीक म्हणून वाद मिटल्यावर लाफेट देण्याची प्रथा आहे. दोन पार्ट्यातील लोचा मिटल्याचं प्रतीक म्हणून हा लोणची चहा वाटला जातो. पूर्वी अगदी कोर्टात जज्ज साहेबांनी निर्णय दिल्यावर लाफेट वाटलं जायचं. कोर्टाने दिलेला निर्णय दोन्ही पार्ट्यांना मान्य असल्याचं हे प्रतीक होतं.

लाफेटची भेट
म्यानमारच्या संस्कृतीत लाफेट चहाच्या लोणच्याचा मोठा वाटा आहे. आपल्याकडे लग्न जमल्यावर जसं पानसुपारी दिली जाते तसं तिकडे चहाचं लोणचं दिलं जातं. जणू काही नवदांपत्याचा ‘’या लोणच्यागत तुमचा संसार मुरू दे, आणि दिवसेंदिवस त्याची चव वाढू दे’’ असा संदेशच ते देतात. घरी आलेल्या पाहुण्यालाही या लोणच्यातल्या चहाने पाहुणचार केला जातो.  २००९ मध्ये या चहाच्या लाफेटमुळे लफडा झाला होता. म्यानमारमधील बहुतेक कंपन्या लाफेटला थायलंड, मलेशिया आणि सिंगापूर सारख्या देशात निर्यात करतात. कामानिमित्त या देशात मोठ्या प्रमाणात म्यानमारी लोक  स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे लाफेटला मागणीही भरपूर. पण यापैकी ४३ ब्रँडमध्ये रासायनिक रंग आढळून आले. सिंगापूर आणि मलेशियाने यावर ताबडतोब बंदी घातली. नैसर्गिक ‘’लाफेट’’ व्यवसायाचा या अनैसर्गिक रंगाने बेरंग केला होता. व्यापाऱ्यांच्या पापाची फळं बिचाऱ्या शेतकऱ्याला भोगावी लागली. लाफेटची विक्री घटली आणि पर्यायाने चहा उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा तोटा झाला. जुनियर टिन आणि लोकल गाईड श्री. हाताय यांनी ‘’म्यानमारच्या मित्रांकडून सप्रेम भेट’’ असं म्हणत लाफेट चा एक डबा माझ्या हातात दिला. मीही या ओल्या चहासाठी भावनांनी ओलेचिंब आभार मानले.

डॉ. सतीलाल पाटील, ९९२२४५९७८४
(लेखक हे ग्रीन-व्हिजन लाइफ  सायन्सेस प्रा. ली. कंपनीचे संचालक आणि ‘ड्रीमर अँड डुअर्स’ पुस्तकाचे लेखक आहेत.)

Read more