[ad_1]
बुलडाणा ः जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये हरभऱ्याला सध्या शासनाच्या हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे. परिणामी, शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्रांवर नावनोंदणी केली असून, विक्रीसाठी तिकडे जात आहेत. यंदाच्या हंगामात इतर पिकांच्या शासकीय खरेदीला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. मात्र, हरभरा खरेदी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.
बाजारपेठांमध्ये सध्या हरभरा चार हजारांपासून तर साडेचार हजारांदरम्यान सर्रास विक्री होत आहे. वास्तविक शासनाचा हमीदर ५२३० रुपये प्रतिक्विंटल आहे. म्हणजेच खुल्या बाजारातील खरेदी दर व हमीभाव याच्यात मोठी तफावत निर्माण झालेली आहे. या फरकामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. परिणामी, शेतकरी शासकीय खरेदी केंद्रांकडे जाऊ लागले आहेत. जिल्ह्यात पणन विभागाच्या खरेदी केंद्रावर आतापर्यंत सुमारे साडेदहा हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. दुसरीकडे खरेदी सुरू झालेली आहे. या खरेदी केंद्रांवर आजपर्यंत सुमारे ११ हजार ८०३ क्विंटल हरभरा खरेदीसुद्धा झाली आहे. सुमारे ६७९ शेतकऱ्यांनी हा हरभरा आतापर्यंत विक्री केला आहे.
पणन विभागामार्फत शेगाव येथे सुरू असलेल्या केंद्रावर सर्वाधिक ४७८६ क्विंटल हरभऱ्याची खरेदी झालेली आहे. तर दुसरीकडे सर्वात कमी खरेदी आतापर्यंत मोताळा केंद्रावर २५३ क्विंटल एवढी झाली. महाराष्ट्र राज्य पणन महामंडळाच्या जिल्हा कार्यालयामार्फत बुलडाणा, देऊळगावराजा, लोणार, मेहकर, मोताळा, संग्रामपूर, शेगाव, साखरखेर्डा, सिंदखेडराजा, लोणार या १० ठिकाणी खरेदी सुरू करण्यात आलेली आहे. या केंद्रांवर आतापर्यंत सहा कोटी १७ लाख रुपये किमतीचा हरभरा खरेदी झालेला आहे. या हंगामात २९ मेपर्यंत खरेदी सुरू राहणार आहे.
तुरीची खरेदी नगण्य
तुरीला खुल्या बाजारात चांगला भाव मिळत असल्याने तुरीच शासकीय खरेदी नगण्यसारखी आहे. जिल्ह्यात पणन विभागाकडे केवळ पाचशे क्विंटलपर्यंत खरेदी होऊ शकली. वास्तविक तूर विक्रीसाठी ७४८१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. तुरीला या हंगामात ६३०० हमीभाव जाहीर झालेला आहे. मात्र या दरांइतका किंवा त्याहीपेक्षा अधिक भाव खुल्या बाजारात मिळत असल्याने तुरीची शासकीय केंद्रावर आवक नाही. शासकीय केंद्रावर तूर विक्रीची मुदत ३१ मार्चपर्यंत आहे.
जिल्ह्यात दहा खरेदी केंद्रावर तूर व हरभरा खरेदी सुरू आहे. हरभरा खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. संस्थांकडून वेअर हाउस उपलब्ध होतील तसे चुकारे ऑनलाइन पद्धतीने केल्या जातील. सध्या गोदाम, बारदाणा सर्वत्र उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी आणावा.
– पी. एस. शिंगणे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, बुलडाणा