Corona… गावचा गोडवा हरवतोय! | Lokshahi.News


image credit – http://www.sarawade.in/

मी ज्यावेळी कोल्हापूरच्या पश्चिम भागात यशकथेसाठी जायचो त्यावेळी अनेक अल्पभूधारक शेतकरी भेटायचे, माझा मुलगा मुंबईला आहे, इकडे थोडीफार शेती आहे, आमचा बरं चाललंय असं सांगायचे, थोडेफार येणारे उत्पन्न व दूध धंद्यावर घर चालतंय तर मुंबईला असलेल्या मुलाकडून मिळालेल्या पैशातून काहीतरी ठोस काम होतय असं सांगताना या शेतकऱ्यांचा ऊर भरून यायचा.

मुलगा दिवाळी उन्हाळी सुट्टीत हमखास गावाकडे येतो त्याची आम्ही चातकाप्रमाणे वाट पाहतो, दहा पंधरा दिवस कसे भुर्रकन उडून जातात हे आम्हाला कळतच नाही .तो जाताना मात्र मन उदास जाते तो जाऊच नये असे वाटते, पण पोटापाण्याचा प्रश्न असतो त्याला तरी कसे अडवणार असे सांगत हे शेतकरी डोळ्यात आसवे आणत असत.

कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुक्यातील बहुतांशी तरुण हे मुंबई पुण्याला नोकरीस आहेत. गेल्या महिन्यापासून कोरोना रुपी अवचित संकटांचा दणका बसला आणि गावे हादरून गेली. पोरगं मुंबईच्या साथीत अडकलंय हे आठवून इथल्या प्रत्येक मायचा घास घशात अडकू लागला. कोणत्याही परिस्थितीत गावाकडे ये बाबा अशीही ही हाक मुंबईच्या मुलालाही गावाकडे खेचू लागली. ज्यावेळी मुले मुंबईहून येत त्यावेळी कधी आला असं म्हणत गप्पा मारणारे ग्रामस्थ आता त्यांच्यापासून दूर पळू लागले.
तो आला की एखादा गुन्हेगार गावात आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली .

आज या भागातून आलेल्या एकाशेतकऱ्याच्या फोनने मला व्यथित केलं. माझ्या पोरांन काय घोडं मारलं की त्याला लोक गावात येऊ देईनात असे सांगत तो शेतकरी माझ्याशी बोलताना हमसून रडू लागला. त्याला काय उत्तर द्यावं हे मलाही कळेना. जवळपास अशीच अवस्था प्रत्येक माय बापाची झाली आहे. सगळी तपासणी झाली तरी गावात येणाऱ्या लेकाला दरोडेखोरासारखे का वागवत आहेत..या प्रश्नाला माझ्याकडे ही उत्तर नव्हते.

अनेकांना कोरोनाने नकळतपणे लपेटले आहे. गावच्या नजरेत असे कुटुंब खलनायक झाले आहे. कुटुंबाची ओढ आणि ग्रामस्थांची नाराजी या अत्यंत धारधार कात्रीत मुंबई पुण्याहून गावाकडे येणारा तरुण अडकला आहे.. रोग टाळण्यासाठी मुंबई पुण्याहून येणारे लोंढे थांबावेत अशी प्रशासनाची इच्छा असली तरी निर्माण होणारी परिस्थिती गावचा गोडवा कमी करत आहे हे मात्र नक्की…

– राजकुमार चौगुले (अॅग्रोवन पत्रकार) यांच्या फेसबुक वॉलवरूनSource link

Leave a Comment

X