happy farming | Agrowon


माणसं आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत फक्त आणि फक्त पैशाचा विचार करतात. या आनंददायी शेतीनं (happy farming) माझी मात्र पैसे कमवण्याची प्रेरणा अधिकच कमकुवत केलीय; पण ही शेती माझं जगणं अधिकाधिक समृद्ध बनवतेय. याचं मोल पैशात करता येत नाही.

मी आनंददायी शेती करतो. खरं तर हा दावा कोणाला धाडसाचा वाटेल. कारण शेती (farming) म्हटलं की, त्रास, अडचणी, कटकटी, कर्जबाजारीपणा, रडारड हे सगळीकडं दिसणारं चित्र आहे. कोणत्याही शेतकऱ्याला (farmer) विचारा, कसं चाललंय? तो लगेच त्याच्या समोरच्या अडचणींचा पाढा वाचेल. बाजारात (market) कशी अडवणूक होतेय, सरकार शेतीमालाचे भाव पाडतंय हे सांगेल. अवर्षण किंवा अतिवृष्टी ही नेहमीचं संकटं. त्यात गेल्या काही वर्षांत हवामान बदलाचा शेतीला मोठा फटका बसतोय. अवेळी पडणारा पाऊस, तीव्र थंडी, तीव्र ऊन, महिनो न् महिने झाकोळलेलं आकाश, सलग दोन-तीन आठवडे वाहणारे कुंभारी वारे, अचानक उद्भवणारी रोगराई, वन्यप्राण्यांचा (रानडुकरं, हरीण, वानरं, सायाळ, मरलांगी, गोगलगायी, मोर, चिमण्या इ.) त्रास… शेतकऱ्यांच्या शत्रुंची ही यादी तशी खूप मोठी आहे. त्यात शेतीत कामासाठी माणसं मिळत नाहीत, ही गंभीर समस्या आहे. त्यामुळे शेतीबद्दल कोणीच चांगलं बोलत नाही. फळ बागायतदार असो, भाजीपाला पिकवणारा असो, ऊसवाला असो की कोरडवाहू शेतकरी असो; कोणीही समाधानी नाही. प्रत्येकाच्या आपल्या समस्या आहेत, प्रश्न आहेत. आणि त्यांच्या जागी ते बरोबरच आहेत. त्यांच्या म्हणण्यात काहीच अतिशयोक्ती नाही. शेतीवर कोणीही गर्भश्रीमंत होऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. अशा स्थितीत मी आनंददायी शेतीबद्दल बोलतोय, ते धाडसच म्हणावं लागेल.

 हे ही वाचा ः कापूस बाजार मजबूत राहणार

माझा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. वडील संतुकराव मंगनाळे ५२ एकरवाले शेतकरी. रब्बीला होणारा गहू, हरभरा आणि भाजीपाला सोडला तर, सगळी कोरडवाहू शेती. एवढी शेती असतानाही सात-आठ जणांचं कुटुंब चालवताना त्यांचे झालेले हाल मी अनुभवले आहेत. दूध, दही, भाज्या आणि गहू, ज्वारीमुळे खायला मुबलक होतं. पण शाळेसाठी वर्षाला दोन ड्रेस आणि एक चप्पल घेताना किती अवघड जायचं ते मी बघायचो. अपवादाने का होईना ठिगळाचे कपडे घालावे लागले. दोन-तीन वर्षे हायब्रीड ज्वारीची चव चाखावी लागली. तुटलेली चप्पल शिवून वापरणं ही सामान्य बाब होती. एवढ्या मोठ्या शेतीतूनही भागत नसल्याने, वडिलांनी हॉटेल, किराणा, कापड, मिरची असे विविध व्यवसाय केले. ते चौथी पास होते. माझ्या वडिलांचं शेतीवर अफाट प्रेम होतं. एवढा त्रास होऊनही त्यांनी शेती विकण्याचा विचार कधी मनात आणला नाही. त्यांच्यासाठी शेती ही दुसरी आईच होती. तरीही शेतीवर सुखा-समाधानाचं आयुष्य जगणं शक्य नाही, याची त्यांना कल्पना होती. आपली मुलं शेतीत येऊ नयेत, यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. एवढ्या आर्थिक अडचणीतही आमचं शिक्षण पूर्ण केलं. आम्ही शेतीत आलो नाही, याचा त्यांना मनापासून आनंद होता. तरीही मी नियमितपणे शेतात येत-जात होतो. शेतीसाठी जमेल तेवढी आर्थिक मदत करीत होतो. त्यामुळं शेतीशी बालपणी जुळलेली नाळ कायम टिकून राहिली.

हे ही वाचाः यंदा रशियाला द्राक्षाची निर्यात होणार का? 

माझ्यावर २००८ मध्ये कौटुंबिक अपरिहार्यतेतून शेतीची जबाबदारी आली. तेव्हा मी ती आनंदानं स्विकारली. तेव्हाच मी मनोमन ठरवलं होतं की, आनंददायी शेती करायची. निसर्गासोबत ‘एन्जॉय’ करायचं.

शेतीत राहायचं म्हणून २०१० साली तीनशे चौरस फुटाचा एक हॉल बांधायला घेतला. पैशाची अडचण होतीच. ते बांधकाम पूर्ण व्हायला २०११ साल उजाडलं. या काळात मी पत्रकारितेतलं लक्ष कमी केलं होतं; मात्र मुक्तरंग प्रकाशनाचं काम जोरात सुरू होतं. नवोदित लेखक-कवींची रीघ होती. वर्षाला शंभर पुस्तकं प्रकाशित करीत होतो. त्यामुळं त्यात भरपूर गुंतलेलो होतो. तरीही वेळात वेळ काढून शिरुरला येत होतो. चार चाकी वाहन  आणि चालक असल्याने रात्री-बेरात्री कधीही शेतात येऊन मुक्काम करायचो. हळूहळू आनंददायी शेतीच्या माझ्या कल्पना स्पष्ट होत गेल्या. इथंच पिकणाऱ्या अन्नावर, फळावर जगता आलं पाहिजे, हे डोक्यात होतं.


मी २०१३ मध्ये शेताच्या वरच्या कोपऱ्यात बांधलेल्या या हॉलला ‘रुद्रा हट’ हे नाव दिलं. त्याच्या समोर अतिशय निकृष्ट अशी जमीन होती. इथं कारळ, हुलगा अशी पिकं घेतली जात. हे कुसळीच्या जमिनीचं आगार होतं. मी इथं फळझाडं लावण्याचा निर्णय घेतला, तेव्हा सगळ्यांनी वेड्यात काढलं. मी तिथं केसर आंबा, चिकू, नारळ, अंजीर, पेरू, संत्री, मोसंबी, डाळिंब, आवळा, लिंबू, जांभूळ, केळी, सीताफळ, बोर ही फळझाडं लावली. सोबत बागेतच एक पिंपळ लावला. विविध फुलांची झाडं लावली. बारमाही या बागेत एक तरी फळ खाण्यासाठी उपलब्ध असावं, ही त्यामागची भूमिका होती. मात्र ही बाग टिकवणं, जोपासणं हे आव्हान होतं. पंचेवीस फुट खोल असलेली विहीर बहात्तर फुटावर नेली. दगडाचा खिळगा काढून सिमेंट काँक्रीटचं कडं टाकलं. पण तरीही उन्हाळ्यातल्या पाण्याचा प्रश्न सुटू शकला नाही. अनिच्छेनेच चार विंधन विहिरी घेतल्या. पण उन्हाळ्यात पाण्याची समस्या कायम राहिली. सलग दोन दुष्काळात टँकरनं पाणी आणून झाडं जगवली. तरी आठ नारळाची, काही आंब्याची झाडं गेलीच. तिथं दुसरी झाडं लावली. बघता बघता झाडं मोठी झाली. पण पाचव्या वर्षीच आंबे, अंजीर, पेरू खायला मिळाले. आता जांभूळ वगळता सगळ्याच झाडांना फळं लागताहेत. त्याचा आनंद पक्ष्यांसह आम्हीही घेतो. आमच्या बागेत बारा महिने कोणतं ना कोणतं फळ खायला असतं. माझ्या आनंददायी शेतीत बाग ही हृदयस्थानी आहे. या बागेला कुठलंच रासायनिक खत घालत नाही. फवारणी करत नाही. नैसर्गिकरित्या जे मिळतं त्यावर आम्ही खूष आहोत. यातून पैसे मिळवणं हा हेतूच नाही. नातेवाईक, मित्र, शेजारी यांनाही ही फळं देतोच.
 
माझ्या बालपणी आमच्याकडं भरपूर जनावरं होती. २००८ मध्ये दोन बैल आणि दोन म्हशी होत्या. मला जनावरांची आवड आहेच. मी शेती हाती घेतल्यानंतर ती आवड जोपासली. शेतीसाठी शेणखत अमृत आहे. एकतर चांगलं शेणखत मिळत नाही. ते परवडतही नाही. खत मिळावं आणि एका सालगड्याच्या पगारीचा मोठा हिस्सा यातून निघावा असा माझा विचार यामागे होता. त्यात मी बऱ्यापैकी यशस्वी झालो. माझ्याकडं २०२१मध्ये  म्हशी, वासरं, रेडा आणि गायी मिळून ३२ जनावरं होती. यावर्षी बाजार पडल्याने पहिल्यांदाच फटका बसला; पण त्याबद्दल माझी तक्रार नाही. व्यवसायात नफ्याबरोबर तोटाही गृहीत आहे. पण ही जनावरं आमच्या शेतीची शोभा आहेत. दूध, दही, ताक, तूप मनसोक्त खातोय. म्हशी, गायी वेतात. छोट्या बछड्यांशी खेळण्याचा आनंद मी घेतो. जनावरांसाठी छान शेड आहेत. त्यांना खायला मिळेल, अशी तरतूद करून ठेवतो. जनावरांच्या सगळ्या कामात मी सहभागी असतो. संख्या कमी-जास्त होत राहील; पण आमच्याकडं गाई-म्हशी राहतीलच. ती आमच्या सहजीवनाचा भाग आहेत.


शेतीत मी दरवर्षी अनुभवाने शिकत गेलो. पायाभूत सुविधांसाठी भरपूर पैसे खर्च केले; पण पिकं घेण्याबाबत कायम व्यवहारी भूमिका ठेवली. कोणाचे सल्ले ऐकून वा यशकथा बघून, मी महागडे प्रयोग करण्याच्या भानगडीत पडलो नाही. गेल्या दहा वर्षांपासून खरीपाला सोयाबीन आणि रब्बीला ज्वारी हीच प्रमुख पिकं घेतोय. त्यात मोठा फायदा नाही की, रडण्यासारखं नुकसान नाही. एकदाच ऊस लावला. सलग दोन वर्षे पाऊस कमी पडल्यामुळे दीड-दोन लाखाला बुडालो; तेव्हाच ठरवलं की, असा कुठलाच प्रयोग आता करायचा नाही.

प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्यायचा, हे मात्र ठरवलं होतं. शेतकऱ्यांचे शारीरिक कष्ट कसे असतात, ते स्वतः अनुभवण्यासाठी गेली चार वर्षे अफाट मेहनत घेतली. शेतीतलं एकही काम असं नाही, की जे मी केलेलं नाही. त्याचा मनसोक्त आनंद घेतला. खरं तर केवळ बागेतच एवढं काम असतं की, दिवसही पुरत नाही.

मला अनेकांनी प्रश्न केला की, एका बाजूला तुम्ही शेतकऱ्यांना शेती सोडा असं सांगता आणि तुम्ही स्वतः मात्र शेतीचं सुंदर, लोभसवाणं चित्र उभं करता, हे कसं? त्यावर माझं उत्तरही ठरलेलं असतं. मी निसर्गप्रेमी आहे. निसर्गात राहायचं म्हणून मी शेती करतो. शेती करणं हा मूळ उद्देश नाही. मी पत्रकार असल्याने, त्या दृष्टीने शेतीकडं बघतो, प्रश्नांची चिकित्सा करतो. तरीही माझ्यातील शेतकऱ्यापेक्षा, निसर्गप्रेमी माणूस अधिक प्रभावी आहे. त्यामुळेच अतिवृष्टीत नुकसानीसोबत सौंदर्यही दिसतं. याचं कारण, तुम्ही मानता तसा मी शेतकरी नाही. शेतीत होणारा तोटा सहन करण्याची आर्थिक क्षमता मी इतर कामातून निर्माण केलीय. त्यामुळे शेतीत होणाऱ्या तोट्याकडं मी सहजतेने बघू शकतो. ही क्षमता नसणारा शेतकरी आनंददायी शेती करू शकणार नाही.

अनेक जण निवृत्तीनंतर, कोणी नाईलाज म्हणून, कोणी यशकथांना भुलून पैसे कमावण्याची स्वप्नं घेऊन शेतीत येतात. वैफल्यग्रस्त होतात. माझी पत्रकारिता, प्रकाशनाचं काम भरभराटीला असताना मी ब्रेक घेतला. कारण प्रत्येक बाबीतून योग्य वेळी बाहेर पडलं पाहिजे, अशी माझी धारणा आहे. त्याप्रमाणं मी ठरवून शेतीत आलो आणि ही आनंददायी शेती सुरू केली.

परवाच मुंबईचा पत्रकार मित्र बोलला, ‘‘काय यार…तुझ्यासारख्या पत्रकारानं शेतात गुरं सांभाळत, शारीरिक कष्टाची कामं करीत बसावं, हे माझ्या बुध्दीला पटत नाही. तुला पैसे, नाव कमावण्याची किती मोठी संधी आहे. या दहा वर्षांत काय मिळवलंस तू?”
मी म्हटलं, ‘‘मी गरजेपुरते पैसे मिळवलेत. कामामुळे जे काही नाव मिळायचं ते मिळवलंय. त्यावर मी खूष आहे. पण मी काय काय मिळवलंय याची यादी खूप मोठी आहे. पूर्वी ॲसिडीटी आणि मध्यरात्रीशिवाय झोप न येणं, या दोन बाबी माझ्यासाठी सगळ्यात त्रासदायक होत्या. मी रुद्राहटवाशी झालो नि या दोन्ही त्रासातून मुक्त झालो. प्रकृती ठणठणीत झाली. याआधी औषधांवर किती पैसे खर्च केले, त्याचा हिशोब नाही.”

‘‘ याशिवाय पहिल्यांदाच मी खऱ्या अर्थाने जगतोय याची जाणीव मला इथं आल्यावरच झाली. सूर्योदय आणि सूर्यास्ताचा अनुभव मी दररोज घेतो. पहाटे पाखरांच्या संगीतानं जाग येते आणि रात्री रातकिडे जंगलात झोपल्याचा आनंद देतात. माझ्या डोळ्यासमोर आकाशात ढग येतात…ते जमिनीवर उतरतात…धो..धो पाऊस पडतो… त्या पावसात मी मनसोक्त भिजतो. कडाडणाऱ्या विजा कोसळताना मी पाहतो. पावसाच्या मातीमिश्रीत रंगीत  पाण्यात फिरतो, भिजतो. अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हातही मी मजेत काम करतो. गारठ्यात शेकोटी करून बसतो. चांदण्या रात्री हातात कारवा रेडिओ घेऊन गाणी ऐकत फिरतो. काळ्या मातीत धान्य पेरतो. ते उगवताना, कलाकलाने वाढताना पाहतो. त्या एका दाण्याचे हजार दाणे होताना बघतो. इच्छा होईल तेव्हा झाडावरचा ताजा पेरू खातो. पिकलेली केळी खातो. सीताफळाच्या दिवसात तर आमची दिवाळी असते. जेवणाची गरजच भासत नाही. मी झोपतो तिथं रात्री निशिगंधाचा तर पहाटे प्राजक्ताचा, चाफ्याचा सुगंध येतो. इथं चोवीस तास शुध्द हवा असते. पिंपळाच्या, केळीच्या पानांची सळसळ पाऊस आल्याचा आभास देते. सतत मोकळ्या अवकाशात वावरतो. इथं कसलंच प्रदूषण नाही. मित्रा, माझ्यासाठी हा स्वर्गच तर आहे. हे एक  स्वतंत्र  जग आहे. मी तुला कितीही पैसे दिले तरी तू हे जग मला देऊ शकशील…?”

मित्रासाठी हा विचार वेडेपणाचा असावा. त्याचा फोन बंद झाला होता. माणसं आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत फक्त आणि फक्त पैशाचा विचार करतात. या आनंददायी शेतीनं माझी मात्र पैसे कमवण्याची प्रेरणा अधिकच कमकुवत केलीय; पण ही शेती माझं जगणं अधिकाधिक समृद्ध बनवतेय. याचं मोल पैशात करता येत नाही.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार व लातूर येथील शेतकरी आहेत.) ९४२२४६९३३९Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment