अश्याप्रकारे करा कमी पाण्यामध्ये फळबागांचे नियोजन | Water Management

सध्या काही भागांत फळबागांसाठी पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. विशेषतः मोसंबी लागवड पट्ट्यात उपलब्ध पाण्याचे योग्य व्यवस्थापन करून बागा जगविणे आवश्‍यक आहे. फळझाडांच्या आळ्यात उसाचे पाचट, लाकडी भुसा, गिरिपुष्पाच्या पानांचे आच्छादन करावे. त्यामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहतो.

बऱ्याच मोसंबी बागांत मृग आणि अंबिया बहाराची फळे होती. पाणीटंचाई लक्षात घेता बागेस पूर्ण विश्रांतीची गरज आहे. शास्त्रीय अभ्यासक्रमातून असे दिसून आले आहे, की चार ते पाच वर्षे वयाच्या झाडावर अडीचशे ते तीनशे फळे जोपासण्यासाठी जमिनीच्या मगदुराप्रमाणे हवेतील आर्द्रता आणि तापमानानुसार 65 ते 75 लिटर प्रति दिन पाण्याची आवश्‍यकता असते. कोणताही बहर न घेता झाडावरील सर्व फळे काढून आच्छादनाचा वापर केल्यास दहा ते पंधरा लिटर पाण्यात फळझाडे जगू शकतात.

आच्छादनांचा वापर –

1) जमिनीतून बाष्पीभवनाद्वारा होणाऱ्या पाण्याच्या ऱ्हासास प्रतिबंध करण्यासाठी विविध प्रकारच्या आच्छादनांची शिफारस करण्यात आलेली आहे. यामध्ये उसाचे पाचट, गव्हाचे काड, झाडाची पाने, लाकडी भुसा, गिरिपुष्पाची पाने, लहान फांद्या किंवा शेतामधील काडीकचऱ्याचा वापर आच्छादनासाठी करावा.

2) सेंद्रिय आच्छादनांमुळे जमिनीचा पोत सुधारतो, जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. फळझाडांच्या आळ्यामध्ये 4 ते 6 इंच जाडीचा सेंद्रिय आच्छादनाचा थर करावा.

3) जेथे शक्‍य आहे तेथे आच्छादनासाठी 80 ते 100 मायक्रॉन जाडीच्या पॉलिफिल्मचा वापर करावा. 40 मायक्रॉन पॉलिफिल्मचादेखील आच्छादनासाठी वापर करता येतो.

फळबाग व्यवस्थापनाचे उपाय –

1) पाणीटंचाई लक्षात घेता फळबागांसाठी ठिबक सिंचन करावे. यामुळे मोसंबी फळाचे दर्जेदार उत्पादन मिळते. फळांची प्रत व गुणवत्ता जोपासली जाते. आवश्‍यक तेवढीच पाण्याची मात्रा झाडाच्या थेट मुळाशी पुरविली जाते.

2) ठिबक सिंचनाने पाण्यात विरघळणारी खते व सूक्ष्म अन्नद्रव्ये झाडांना पुरवावीत.

3) खोडावर बोर्डोपेस्ट लावल्यामुळे कडक उन्हापासून फळबागांचे होणारे नुकसान टाळता येते. बोर्डोपेस्ट तयार करण्यासाठी एक किलो मोरचूद, एक किलो चुना 10 लिटर पाण्यात मिसळावा. ही बोर्डोपेस्ट झाडांच्या खोडास लावावी. यामुळे डिंक्‍या रोगाचे नियंत्रण होते.

4) फळझाडांवर पोटॅशियम नायट्रेट 1 ते 1.5 टक्का (एक किलो पोटॅशियम नायट्रेट प्रति 100 लिटर पाणी) याची फवारणी केल्यामुळे झाडाचे तापमान कमी होऊन पाण्याच्या उत्सर्जनास प्रतिबंध होतो. याच्या फक्त दोनच फवारण्या पंधरा ते वीस दिवसांच्या अंतराने कराव्यात.

5) पाणीबचतीसाठी झाडाचा पर्णभार कमी करावा. रोगग्रस्त फांद्या, एकमेकांत अडकलेल्या फांद्या कमी कराव्यात. पाणसोट काढावेत. यामुळे झाडावरील पर्णभार कमी होऊन पानातून उत्सर्जनाद्वारा होणाऱ्या पाण्याचा ऱ्हास टाळता येतो.

पाणीबचतीचे उपाय –

1) जेथे ठिबक सिंचन शक्‍य नाही तेथील बागांमध्ये मडका सिंचन पद्धतीचा उपयोग करावा. झाडाच्या मुळांना हळुवार ओलावा मिळण्यासाठी मडक्‍यांना छिद्र पाडावे. ही पद्धत कमी क्षेत्र आणि जेथे मडके सहज उपलब्ध आहे तेथे उपयुक्त आहे.

2) लहान झाडाकरिता 5 लिटर, तर मोठ्या झाडासाठी 15 लिटर क्षमतेचे मडके वापरावे. झाडाच्या खोडापासून 2 ते 2.5 फूट अंतरावर मडके जमिनीत गाडावे. प्रत्येक दिवशी मडके पाण्याने भरावेत.

3) मडक्‍यातील पाण्याचे बाष्पीभवन टाळण्यासाठी त्याचे तोंड उसाचे पाचट, गव्हाचे काड, झाडाची पाने, गिरिपुष्पाची पाने, लहान फांद्या इत्यादी सेंद्रिय पदार्थांनी किंवा मातीच्या थाळीने झाकावे. अशा पद्धतीने झाडांना आवश्‍यक तेवढाच पाणीपुरवठा करता येतो.

संपर्क – डॉ. एम. बी. पाटील – 7588598242(लेखक मोसंबी संशोधन केंद्र, बदनापूर, जि. जालना येथे कार्यरत आहेत.)

संबंधित बातम्या – 

What Payday Mortgage Regulation Modifications Imply For You

[MJPSKY] महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्ज माफी योजना | संपुर्ण माहिती

(Village Wise 2nd Yadi) Mahatama jyotirao Phule karj Mafi 2nd List 2020 Download PDF

[Download GR] खरीप पीक विमा योजनेसाठी 500 कोटींची रक्कम नवीन शासन निर्णय दि.25 फेब्रुवारी 2020

Coronavirus : शेतकरी कर्जमाफी योजनेलाही कोरोना व्हायरसचा फटका

कर्जमाफीबद्दल मोठी अपडेट : मयत शेतकऱ्यांच्या वारसांना कर्जमाफीचा लाभ मिळणार – MJPSKY

Leave a Comment

X