Maharashtra Politics : एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

0
4.7/5 - (3 votes)

मुंबई: उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्याला एक पर्यायी सरकार देण्याची गरज होती, ती आम्ही देतोय. एकनाथ शिंदे हेच राज्याचे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा आज भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. या सरकारची जबाबदारी आमची असेल, आज संध्याकाळी साडे सात वाजता एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होईल.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “या सर्व परिस्थितीमध्ये शिवसेना आमदारांची कुचंबना होत होती. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत न जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर एक पर्यायी सरकार देणं गरजेचं होतं. म्हणून आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना विधीमंडळ गट, भाजप आणि 16 अपक्ष या सर्वाच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील.”

देवेंद्र फ़डणवीस म्हणाले की, “गेल्या वेळच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेला बहुमत मिळालं, पण त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी हे बहुमत झुगारलं आणि हिंदुत्वाच्या विरोधात विचारधारेच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्याचा विचार केला. या अडीच वर्षाच्या काळात या सरकारने प्रचंड भ्रष्टाचार केला, या सरकारचे दोन मंत्री तुरुंगात जाणं हे खेदजनक आहे. एकीकडे माननीय बाळासाहेब ठाकरेंनी देशाचा शत्रू असलेल्या दाऊदचा विरोध केला तर दुसरीकडे त्याच्याशी संबंधित मंत्र्याला मंत्रिपदावरून काढण्यात आलं नाही. शेवटच्या दिवशी जाता जाता या सरकारने संभाजीनगर हे नामांतर केलं. राज्यपालांचे पत्र आल्यानंतर कोणतीही कॅबिनेट घेता येत नाही, पण ती घेतली.”

एकनाथ शिंदे काय म्हणाले?
संख्याबळ असतानाही देवेंद्र फडणवीसांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदाची संधी दिली, फडणवीसांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही असं एकनाथ शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील. त्यांनी राज्यपालांकडे जाऊन सत्ता स्थापनेचा दावा केला, त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे आज संध्याकाळी साडेसात वाजता शपथ घेणार आहेत.

Eknath Shinde Latest Update
Share via
Copy link