Soybean Crop Care । सोयाबीन पिक फुल अवस्थेत असताना ही काळजी नक्की घ्या… - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

Soybean Crop Care । सोयाबीन पिक फुल अवस्थेत असताना ही काळजी नक्की घ्या…

0
4.9/5 - (10 votes)

सोयाबीन पिक तसं कमी कष्टाचं पीक म्हटलं जातं. आणि ह्या पिकासाठी कष्टही कमी घ्यावे लागते. म्हणून अनेक शेतकरी खरीप हंगामामध्ये सोयाबीनची पेरणी करतात. पण अलीकडच्या काळात प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं आपले उत्पन्न जास्त यावे यासाठी शेतकरी अतोनात प्रयत्न करत असतो. सोयाबीन पिकाचे चांगले उत्पन्न येण्यासाठी विनाकारण कष्ट करण्यापेक्षा थोडा टेक्निकली विचार करून सोयाबीन पीक घेतले तर निश्चित पिकाचे उत्पन्न चांगले येऊ शकते.

सोयाबीन पिक फुल अवस्थेत असताना योग्य काळजी घेणे गरजेचे असते. सोयाबीन पीक फुल अवस्थेत असताना जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर सोयाबीनचे उत्पन्न कमी होऊ शकते. यासाठी फुल अवस्थेत असताना विशेष काळजी घ्यावी.

1) सोयाबीन पिक फुल अवस्थेत असताना पिकामध्ये कोळपणी, खुरपणी करू नये. कोळपणी, खुरपणी करताना सोयाबीन पिकाला धक्का लागून फुले गळण्याची शक्यता असते, यासाठी सोयाबीन पीक फुलोऱ्यात असताना अंतर मशागत करू नये.

2) रासायनिक खतांचा वापर करू नये. पिक फुलोऱ्यात असताना रासायनिक खतांचा वापर केल्यास फुलगळ होण्याची शक्यता असते. तसेच रासायनिक खत फुलोऱ्यात पडल्यावर फुले खराब होऊन गळून जातात.

3) सोयाबीन फुल अवस्थेत असताना तणनाशकाचा वापर करू नये. फुल अवस्थेत असताना तणनाशकाचा वापर केल्यास सोयाबीन पिकावर ताण येऊन सोयाबीन पिकाची फुलगळ होत असते.

4) फुल अवस्थेत कीटकनाशकांचा वापर शक्यतो टाळावा. सोयाबीन पिक फुलअवस्थेच्या आधी आणि फुल अवस्थेच्या नंतर कीटकनाशकांचा वापर करावा.

5) फुल अवस्थेत सोयाबीन पिकाला पाण्याचा ताण पडून देऊ नये पाण्याचा ताण पडल्यास सोयाबीन पिकाची फुलगळ होत असते.

6) अनेक शेतकरी सोयाबीन पिक फुलोऱ्यात असताना प्लॉटमध्ये जाऊन फवारणी खुरपणी कोळपणी करत असतात, पण सोयाबीन पीक फुलोऱ्यात असताना जर आपण प्लॉटमध्ये ये-जा केल्यास परागीकरण होण्यास प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे सोयाबीन पीक फुलोऱ्यात असताना शेतामध्ये जाणे टाळावे.

7) जास्त औषधांचे एकत्रीकरण करणे टाळावे. जर आपण जास्त औषधांचे एकत्रित करून फवारणी घेतली तर पिकामध्ये अतिरिक्त उष्णता निर्माण होऊन फुलगळ होण्याची शक्यता असते.

जर आपण वरील बाबींचा काटेकोरपणे पालन केले, तर निश्चित आपले सोयाबीन पीक चांगले येऊन उत्पन्न वाढेल. जर पिकाची फुलगळ झाल्यास सोयाबीन पिकाला शेंगा कमी लागतात, आणि शेंगा कमी लागल्यावर सोयाबीनचे उत्पन्न कमी होत असते. यासाठी फुल अवस्थेत वरील काळजी घेणे फायद्याचे ठरते.

सौजन्य – कु. अनिकेत शेळके (पिक सल्लागार, बी.टेक एग्रीकल्चर)

Soyabin Flowering Stage Care in Marathi
Share via
Copy link